www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ट्वेन्टी - 20 विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये युवराज सिंहने फॅन्सची निराशा केली, आणि युवीमुळे टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला, अशा चर्चेला ऊत आला. सोशल नेटवर्किंगवर युवीवर अतिशय वाईट पद्धतीने टीका होत असतांना दिसतेय.
खास करून व्हॉटस अॅपवर पराभवाचं खापर काहीही विचार न करता युवीवर फोडलं जातंय. काहीही अतिउत्साही हे मेसेजेस फॉवर्ड करतांना दिसतायत.
मात्र सतत टीकेचा भडीमार सहन करणाऱ्या युवराजला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिलासा दिला आहे.
सचिन तेंडुलकर युवराजच्या बचावासाठी उभा राहिला आहे, लवकरच टीकाकारांना युवराज आपली योग्यता सिद्ध करून दाखवेल आणि शानदार बॅटिंग करतांना दिसेल, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.
सचिन तेंडुलकरने आपल्या फेसबुक पेजवर लिहिलं आहे, कालचा दिवस युवीसाठी अतिशय कठीण दिवस होता, त्याच्यावर टीका होऊ शकते, पण यासाठी त्याला सुळावर चढवल्या सारखं करू नका, आणि टीम बाहेर करू नका, असं सचिननं म्हटलं आहे.
सचिन तेंडुलकरने युवराजच्या मागील कारकीर्द आठवणीने सांगितली आहे. आम्हाला सर्वांना युवीच्या साहसी खेळीवर गर्व आहे.
जेव्हा आम्ही 2007 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. तसेच 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला, युवीच्या या साहसी, असाधारण योगदानाला आम्ही नेहमी लक्षात ठेऊ.
फायनल मॅच आणि टीम इंडिया
सचिन म्हणतो, युवी नेहमीच आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार असतो, तो टीकाकारांना युवी आपल्या खेळाने उत्तर देऊन निश्चित चुकीचं ठरवेल.
रविवारी टी 20 सामन्यात वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये युवराज सिंहकडून खुप साऱ्या अपेक्षा होत्या, मात्र युवीच्या बॅटिंगने सर्वांची निराशा केली.
युवीने 21 चेंडूत फक्त 11 धावा केल्या.
भारताने दिलेलं 130 धावांचं लक्ष्य श्रीलंकाने 4 विकेट आणि 17.5 ओव्हर्समध्ये पूर्ण करून विजयावर शिक्कामोर्तब केला.
भारताकडून युवराजला फायनलमध्ये सुरेश रैनाच्या जागेवर चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं होतं.
कॅप्टन कूल धोनीकडूनही बचाव
धोनीचा यापूर्वी महेंद्र सिंह धोनीने ही बचाव केला आहे. युवराजने सामना जिंकण्यासाठी सर्व पद्धतीने प्रयत्न केले, मात्र त्याचा दिवसच खराब होता, असं धोनीने म्हटलंय.
टी - 20 वर्ल्ड कप फायनलनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत धोनीला विचारण्यात आलं की, अतिशय धिम्या गतीने बॅटिंग करणाऱ्या युवराजला सामन्या दरम्यान काही सल्ला देण्यात आला होता का, यावर धोनीने सांगितलं, नाही, युवराज पूर्ण प्रयत्न करतांना दिसत होता, मात्र अशा स्थितीत त्यापेक्षा जास्त काही करता आलं नाही.
तसेच एका टीमचा विजय किंवा पराभव या संपूर्ण टीमवर अवलंबून असतो, म्हणून कोणत्याही एका व्यक्तीवर प्रश्नचिन्हं लावलं जावू नये.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.