मुंबईकर अजिंक्यची पहिली-वहिली टेस्ट सेन्चुरी!

मुंबईकर अजिंक्य रहाणेनं वेलिंग्टन टेस्टमध्ये आपल्या बॅटिंगनं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. त्यानं आपल्या करिअरमधील पहिली सेंच्युरी झळकावली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 15, 2014, 07:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईकर अजिंक्य रहाणेनं वेलिंग्टन टेस्टमध्ये आपल्या बॅटिंगनं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. त्यानं आपल्या करिअरमधील पहिली सेंच्युरी झळकावली. टीम इंडियाला त्यानं अडचणीतून बाहेर काढलं. त्याचप्रमाणे अजिंक्यनं महेंद्रसिंगधोनीबरोबर केलेली पार्टनरशिप भारताच्या इनिंगमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. आपल्या या खेळाचं श्रेय त्यानं सचिन तेंडुलकर आणि द्रवीडला धन्यवाद दिलेत.
अजिंक्य रहाणे... टीम इंडियाच्या युवा बिग्रेडचा मिडल ऑर्डर बॅट्समन... आपल्या बॅटिंगनं त्यानं याआधीच साऱ्यांना प्रभावित केलं आहे. वेलिंग्टन टेस्टमध्येही याचीच प्रचिती आली. पहिली टेस्ट गमावल्यानंतर दुसरी टेस्ट टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरतेय. याच प्रतिष्ठेच्या लढाईत भारताला वर्चस्व मिळवून देण्याचं काम त्यानं केलं.
अजिंक्यनं सुरुवातील विराट कोहली आणि नंतर महेंद्रसिंग धोनीच्या साथीनं किवी फास्ट बॉलर्सचा यशस्वी सामना केला. अजिंक्य रहाणेनं या मॅचमध्ये आपल्या भात्यातील सारेच फटके मारत किवी बॉलर्सना चांगलाच दणका दिला. अजिंक्य आपल्या टेस्ट करिअरमधील पहिली सेंच्युरीही झळकावली. टेस्टमधील पहिल्या-वहिल्या सेंच्युरीचा आनंद त्याला लपवता आला नाही. 
 
अजिंक्य रहाणेनं १५८ बॉल्समध्ये १७ फोर आणि एका सिक्सच्या सहाय्यानं ११८ रन्सची शानदार इनिंग खेळली. ७४.६८ च्या स्ट्राईक रेटनं त्यानं हे रन्स केले.
रोहित शर्मा आऊट झाल्यावर अजिंक्य रहाणे मैदानावर आला. त्यानं विराट कोहलीबरोबर आधी टीम इंडियाची इनिंग सावरली. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीबरोबरही त्यानं शंभरहून अधिक रन्सची पार्टनरशिप केली. ही पार्टनरशिपच भारताच्या इनिंगचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य ठरलं.
महेंद्रसिंग धोनी आणि अजिंक्य रहाणेनं सातव्या विकेटसाठी २४.१ ओव्हर्समध्ये १२० रन्सची पार्टनरशिप केली. याच पार्टनरशिपमुळे भारतीय टीमला न्यूझीलंडच्या टीमवर २४६ रन्सची आघाडी घेता आली. अजिंक्य रहाणेनं आपल्या टेस्ट करिअरमधील पहिल्या सेंच्युरीला गवसणी घातली आहे. त्यामुळे आगामी काळात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.