आयपीएलचे ‘ऑपरेशन क्लीन-अप’

आयपीएल प्रकरणाची चौकशी चालू असतानाच ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी समितीनं आयपीएल ‘ऑपरेशन क्लीन अप’चा नवीन मसुदा मांडलाय.

Updated: Jun 11, 2013, 11:11 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गेल्या काही दिवसापासून चालू असलेल्या स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणाने क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडवून दिली. या सर्व प्रकरणाची चौकशी चालू असतानाच ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी समितीनं आयपीएल ‘ऑपरेशन क्लीन अप’चा नवीन मसुदा मांडलाय.
‘आयपीएल’च्या या नवीन योजनेत १२ कलमांचा सामावेश करण्यात आला आहे. या योजनेत पहिला मुद्दा म्हणजे चीअरलीडर्स नकोत आणि सामन्यानंतर खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफसाठी होणाऱ्या पार्ट्यावर बंदी घातली जाईल. खेळाडू, सपोर्ट स्टाफ व फ्रेंचाइझी मालकांनी आचारसंहितेचे कठोर पालन करावे यांसारख्या अनेक गोष्टींचा यात सामावेश केला गेलाय.
आयपीएलच्या या नवीन स्वच्छता योजनेमुळे आयपीएलला लागलेली घाण किती प्रमाणात स्वच्छ होईल हे लवकरच कळेल.

‘ऑपरेशन क्लीन-अप’चा मसुदा
> चीअरलीडर्सवर बंदी. खेळाडू व सपोर्ट स्टाफसाठी सामन्यानंतर पार्ट्यांचे आयोजन नाही.
> खेळाडू, सपोर्ट स्टाफ व फ्रँचाइझीच्या मालकांनी आचारसंहितेचे कठोरपणे पालन करणे बंधनकारक.
> आयपीएलदरम्यान मैदानावर असलेल्या खेळाडूंच्या कक्षात (डगआऊट) व ड्रेसिंग रूममध्ये प्रवेशावर निर्बंध.
> सामन्यांदरम्यान मालकांनाही डगआऊट व ड्रेसिंगरूममध्ये प्रवेशास मनाई.
> सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफला यापुढे आपले फोननंबर स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयकडे सादर करावे लागणार.
> संघाचे हॉटेल तसेच मैदानावर नजर ठेवण्यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे अधिकाऱ्यांची नेमणूक होणार
> सामन्यांदरम्यान मैदानातील मोबाइल फोनचे टॉवर बंद ठेवणार
> नव्या सूचनांसाठी व नव्या योजनांचा आराखडा तयार करण्यासाठी कर्णधारांच्या बैठका.
> राष्ट्रीय निवड समितीतील सदस्याला कोणत्याही संघातील कोणतेही जबाबदारीचे पद भूषविता येणार नाही.
> कोणत्याही संस्था किंवा व्यक्तीशी खेळाडूंचे असणारे आर्थिक व्यवहार उघड करणे बंधनकारक.
> प्रत्येक संघाने खेळाडू व सपोर्ट स्टाफशी केलेल्या मोबदला अथवा करारासंदर्भातील व्यवहाराची संपूर्ण माहिती देणे बंधनकारक.
> खेळाडूंना मायक्रोफोन व इयर प्लग लावण्यास मनाई.
> सुरक्षा नियंत्रणासंदर्भातील धोरण लवकरच अस्तित्वात.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.