'सॉल्ट लेक' आयपीएलच्या उद्घाटनासाठी सज्ज...

पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात शहराचं महाकाय ‘सॉल्ट लेक स्टेडियम’ ‘आयपीएल सीजन-६’च्या उद्घाटन सोहळ्यासाठी सज्ज झालंय.

Updated: Apr 2, 2013, 03:37 PM IST

www.24taas.com, कोलकाता
पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात शहराचं महाकाय ‘सॉल्ट लेक स्टेडियम’ ‘आयपीएल सीजन-६’च्या उद्घाटन सोहळ्यासाठी सज्ज झालंय. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या या महास्पर्धेचा उद्घाटन सोहळा मंगळवारी संध्याकाळी रंगणार आहे. या उद्घाटनाची जबाबदारी शाहरुखची कंपनी ‘रेड चिली’कडे सोपवण्यात आलीय.
या उदघाटन सोहळ्यासाठी क्रिकेट, सिनेमा आणि राजकारणातील मोठ्-मोठे दिग्गज हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये शाहरूख खान सोबत दीपिका पादुकोण आणि कैतरीना कैफ आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करतील तर अमेरिकेचा रैपर पिटबुलचा परफॉर्मन्स आकर्षणाचा विषय ठरणार आहे. या सोहळ्यासाठी यापूर्वी हॉलीवूडची दिग्गज गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेजचं नाव पुढे येत होतं पण ऐनवेळी आयोजकांनी पिटबुलशी करार केला.

आयपीएलचे कमिश्नर आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या विभिन्न भागात सात आठवडे चालणाऱ्या या महास्पर्धेचं महत्त्व पाहता या उद्घाटन सोहळ्याला अधिकाधिक रंजक बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेत.
आयपीएलचा सहावा सीझन ३ एप्रिल ते २६ मे दरम्यान चालणार असून पहिली मॅच कोलकत्ता नाईट राईडरस आणि दिल्ली डेयरडेविल्समध्ये रंगणार आहे. हा भव्य सोहळा पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारणास्तव कोलकत्तामधील प्रमुख हॉटेल आणि स्टेडियमवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे या सोहळ्याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता दिसून येतेय.