आफ्रिका दौऱ्यासाठी आज संघ निवड

आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड आज सोमवारी करण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघातून बाहेर असलेला अनुभवी फलंदाज गौतम गंभीर आणि स्टार गोलंदाज झहीर खान यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 25, 2013, 12:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बडोदा
आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड आज सोमवारी करण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघातून बाहेर असलेला अनुभवी फलंदाज गौतम गंभीर आणि स्टार गोलंदाज झहीर खान यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघ आफ्रिका दौर्यासत ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे.
भारताच्या वन-डे संघात वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील सर्वच सदस्यांना जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, कसोटी संघात अनेक बदल बघायला मिळू शकतात. हरियाणाविरुद्धच्या रणजी लढतीत शानदार १५३ धावांची खेळी करणाऱ्या गौतम गंभीरने रणजी सत्रातील ६ डावांमध्ये ७४ हून अधिकच्या सरासरीने ३७२ धावा केल्या आहेत. त्याने मुंबईविरुद्धच्या लढतीत दोन्ही डावांमध्ये अर्धशतकी खेळी केली होती.
शिखर धवनचे कसोटी संघात सलामीवीर म्हणून स्थान निश्चिीत मानले जात आहे. विजयचे स्थान डळमळीत आहे. गंभीरला सलामीवीर म्हणून त्याच्या जागी स्थान मिळू शकते. सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यामुळे रहाणेला सहाव्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून ११ खेळाडूंत जागा मिळू शकते.
कर्णधार महेंद्रसिंह धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. टीम इंडियाची कसोटीतील रनमशीन चेतेश्वतर पुजारा आणि रोहित शर्मा अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानावर खेळतील. ऑफ स्पिनर आर.आश्वि‍न अंतिम ११ खेळाडूंत एकमेव फिरकी गोलंदाज असू शकतो. दुसऱ्या फिरकीपटूसाठी रवींद्र जडेजा आणि प्रज्ञान ओझा यांच्यात चुरस आहे. मोहंमद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांनी गत काही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करून संघात आपले स्थान पक्के केले आहे.
हरियाणाविरुद्धच्या रणजी लढतीत ९ गडी बाद करून ईशांत शर्माने निवड समितीचे लक्ष वेधले आहे. उमेश यादवने २ रणजी सामन्यांमध्ये ४ गडीच बाद केले. मात्र, त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे तो संघात स्थान मिळवू शकतो. संघातील १५ सदस्याच्या रूपात निवड समिती अतिरिक्त फलंदाज खेळविते की, यष्टिरक्षकाला संधी देते हे बघणे महत्त्वाचे ठरेल.
पाचव्या गोलंदाजासाठी अनुभवी झहीर खान याच्यासह आर. विनय कुमार, जयदेव उनाडकट, मोहित शर्मा शर्यतीत आहेत. रिद्धीमान साहा याला याआधी विदेशी दौऱ्यावर कसोटी मालिकेत दुसरा यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान मिळालेले आहे. वन-डेत ही जबाबदारी दिनेश कार्तिक निभावतो. निवड समितीने जर यष्टिरक्षकाऐवजी अनुभवी फलंदाजाला निवडण्यात आले, तर सुरेश रैनाही संघात स्थान मिळवू शकतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.