www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
धर्माप्रमाणे जपल्या जाणा-या क्रिकेटचा आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणाने घात केला. कोट्यवधी फॅन्सच्या आशा आकांक्षांचा चुराडा करणा-या फिक्सिंगमुळे जंटलमन्स गेममधील जंटलमन अशी ओळख असणारा राहुल द्रविडही निराश झाला आहे. त्यामुळे लोकांचा विश्वास संपादन करण्याकरता खेळातील विश्वासार्हता जपा असा इशारा द्रविडने क्रिकेटर्ससह बीसीसीआयला दिला आहे.
दिग्गज क्रिकेटर्सकरता लागणा-या कोटींच्या घरातील बोली, मैदानातील सेलिब्रिटीजची लक्षणीय उपस्थिती यांमुळे इंडियन प्रीमिअर लीग नेहमीच चर्चेत असायची. मिष्कील भाषेत सांगायचं, तर आयपीएलला ख-या अर्थाने लौकिक प्राप्त करून दिला तो सहाव्या सीझनमधील स्पॉट फिक्सिंगने आणि त्यापाठोपाठ उघड झालेल्या हायप्रोफाईल बेटिंग प्रकरणाने तर आयपीएलमध्ये तडक्याचं काम केलं. या प्रकरणानंतर आयपीएलमध्ये पडणा-या प्रत्येक बॉलकडे, त्या बॉलवर निघणारे रन्स आणि जाणा-या विकेट्सकडे फॅन्स संशयाच्या दृष्टिकोनातून पाहू लागले. हे घडणं स्वाभाविकच होतं. पैशाच्या हव्यासापायी आंधळे झालेल्या लीग आयोजकांना आणि क्रिकेटर्सना या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येत नसलं, तरी क्रिकेटमधील खरा जंटलमन असणा-या राहुल द्रविडला याचे दूरगामी परिणाम दिसत आहेत आणि म्हणूनच त्याने क्रिकेटप्लेअर्सना आणि क्रिकेट अधिका-यांना सावधान राहून गेलेली विश्वासर्हता परत मिळवण्याचा इशारा दिला आहे.
कोटी फॅन्स आजही क्रिकेटला पाठिंबा दर्शवत आहेत. त्यांच्यामुळेच आम्हा क्रिकेटर्सना आणि क्रिकेट व्यवस्थापकांना वेगळी ओळख मिळाली आहे. त्यामुळे क्रिकेटची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी आताच कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे. कारण कोणत्याही खेळाच्या लोकप्रियतेकरता तो खेळ फॅन्ससाठी पारदर्शक असणं गरजेचं असतं. फिक्सिंगसारख्या प्रकरणांमुळे क्रिकेटर्सना आपलं सर्वस्व गमवावं लागतं. मला वाटतं या गोष्टी क्रिकेटसाठी हानिकारक आहे, अशा शब्दांत द्रविडने आपली खंत व्यक्त केली आहे.
राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये खेळणा-या राजस्थान रॉयल्समधील तीन क्रिकेटर्स फिक्सिंगमध्ये अडकल्याने हे प्रकरण द्रविडकरता क्लेशदायक ठरत आहे... त्यातच क्रिकेटला सुधारण्याच्या गोष्टी करणा-या बीसीसीआयचा भोंगळ कारभार मुंबई हाय कोर्टाने उघड केल्याने तर क्रिकेटच्या उरल्या सुरल्या प्रतिमेलाही जबरदस्त तडाखा बसला आहे. मैदानात खेळणारे क्रिकेटर्स आणि मैदानाबाहेर क्रिकेटची दिशा ठरवणारे व्यवस्थापक यांनी आता तरी समजून उमजून क्रिकेटची प्रतिमा सावरण्याकरता कडक पावलं उचलणं आवश्यक झालं आहे. केवळ डॅमेज कंट्रोल करून चालणार नाही. तर राहुल द्रविडसारख्या सीनिअर क्रिकेटरने दिलेल्या इशा-यांचीही गंभीर दखल बीसीसीआयने घेतली पाहिजे. तरच भारतीय क्रिकेटची गेलेली पत परत मिळवणं शक्य होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.