लक्ष्मणच्या पार्टीचं धोनीला नव्हतं निमंत्रण

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेद्रसिंग धोनीनं व्ही. व्ही. एस लक्ष्मणन आपल्याला त्याच्या पार्टीत बोलावलं नसल्याचं म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 22, 2012, 04:31 PM IST

www.24taas.com, हैद्राबाद
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेद्रसिंग धोनीनं व्ही. व्ही. एस लक्ष्मणन आपल्याला त्याच्या पार्टीत बोलावलं नसल्याचं म्हटलंय. लक्ष्मणनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ताबडतोब निवृत्ती जाहीर केल्यानंतर सगळ्यांनाच चक्रावून टाकलं होतं. त्यामागची कारणं काय होती, हा प्रश्न अजूनही अनेकांना सतावतोय.
उद्यापासून सुरु होणाऱ्या भारत-न्यूझीलंड टेस्ट क्रिकेट सीरिजमध्ये दोन सामन्यांसाठी लक्ष्मणची निवड झाली होती. पण, हा सामना होण्याअगोदरच लक्ष्मणनं ताबडतोब निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. यावर अनेक जणांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. तेव्हापासून लक्ष्मणनं इतक्या तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर करण्यामागची कारण काय, यावर विविध चर्चांना उधाण आलंय. निवृत्ती घेण्यासाठी त्याला कुणी प्रवृत्त केलं हा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला गेला.
लक्ष्मणनं हैद्राबादमधल्या मानिकांड स्थित निवासस्थानावर मंगळवारी एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीसाठी सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि झहीर खान हेही उपस्थित होते. पण, या पार्टीसाठी टीम कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला मात्र आमंत्रण मिळालं नव्हतं. ही गोष्ट धोनीनंच स्पष्ट केलीय. भारत-न्यूझीलंड टेस्ट सीरिजच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी धोनीला लक्ष्मणच्या पार्टीचं आमंत्रण मिळालं होतं का? असा प्रश्न विचारला असता त्यानं स्पष्टपणे ‘नाही’ असं उत्तर दिलंय.
लक्ष्मणनं निवृत्ती जाहीर करताना, आपल्याला धोनीपर्यंत पोहचणं कठिण होतं, असं म्हटलं होतं. यावर विचारलं असता धोनी म्हणाला, ‘हा वाद आहे असं तुम्हाला वाटतं, पण जे लोक मला जवळून ओळखतात त्यांना हे अगोदरपासून माहित आहे की मी असाच आहे. माझ्याशी संपर्क करणं कठिणच आहे. लक्ष्मण माझ्याशी संपर्क करू शकला नाही त्यापाठीही हेच कारण होतं. यामध्ये कोणतीही नवीन गोष्ट नाही. माझी ही सवय बदलण्याचाही मी खूप प्रयत्न करतोय पण अजूनही त्यात सुधारणा घडवून आणणं मला जमलेलं नाही’.