लक्ष्मणनंतर प्रेक्षकांनीही घेतला मैदानावरून संन्यास...

भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट मॅचेसला उद्यापासून सुरुवात होतेय. व्ही. व्ही. एस. लक्ष्मणनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ जाहीर निवृत्ती केल्याचा परिणाम लगेचच या मालिकांवर दिसून आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 22, 2012, 02:06 PM IST

www.24taas.com, हैद्राबाद
भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट मॅचेसला उद्यापासून सुरुवात होतेय. व्ही. व्ही. एस. लक्ष्मणनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ जाहीर निवृत्ती केल्याचा परिणाम लगेचच या मालिकांवर दिसून आलाय. प्रेक्षकांनी या टेस्ट मॅचेसकडे पाठ फिरवल्याचं चित्र सध्या दिसून येतंय. तिकिटांची विक्रीतही घट झालीय.
सूत्रांच्या माहितीनुसार, ३९,००० प्रेक्षक सामावून घेण्याची क्षमता असलेल्या राजीव गांधी स्टेडियममध्ये होणाऱ्या मॅचच्या आत्तापर्यंत फक्त २,५०० तिकीटांची विक्री झालीय. ‘एचसीए’चे अधिकारी तर सात ते दहा हजार प्रेक्षकांनी उपस्थिती लावली तरी धन्यता मानतील, अशी प्रतिक्रिया ‘हैद्राबाद क्रिकेट संघातून’ व्यक्त होतेय. ‘पहिल्यांदाच तिकीट विक्री कमी झाली होती... त्यातच लक्ष्मणनं निवृत्ती जाहीर केल्यानंतर प्रेक्षकांचंही या मॅचेसमधून ध्यान उडालंय. कमीत कमी लक्ष्मणची शेवटची मॅच पाहण्यासाठी तरी प्रेक्षक मैदानावर हजेरी लावतील, अशी आमची अपेक्षा होती. पण, आता ती शक्यताही मावळलीय, अशी प्रतिक्रिया एचसीएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय.
पाच दिवसांच्या मॅचच्या तिकीटांच्या विक्रीतून आत्तापर्यंत दहा लाख रुपये जमा झालेत. यामध्ये ऑनलाईन बुकिंगचा समावेश नाही.