www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मी सचिन तेंडुलकर याला निवृत्तीचा सल्ला दिलेला नाही. तसेच निवृत्तीबाबत त्याच्याशी काहीही बोललो नाही, असा खुलासा निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी पीटीआयशी बोलताना केला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका ही सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी असेल, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे वृत्त माझ्या नावाने दिले होते. मात्र, तसे काहीही नाही. संदीप पाटील यांनी सचिनशी निवृत्तीबाबत चर्चा केल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. याबाबत पीटीआयने वृत्त दिले आहे.
संदीप पाटील म्हणालेत, सचिनशी कोणतीही चर्चा झाली नाही. सचिनला भेटणे ही नेहमीच एक आनंददायी बाब असते, पण गेल्या दहा महिन्यांत सचिनची व माझी भेट झालेली नाही. मी त्याला वा त्याने मला फोन केलेला नाही. त्यामुळे आमच्यात निवृत्तीबाबत काय कोणत्याच विषयावर चर्चा होणे शक्यच नाही, असेही पाटील म्हणालेत.
येत्या नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सचिन कारकिर्दीतील २००वी कसोटी खेळणार आहे. मात्र ही कसोटी त्याच्या कारकिर्दीतील अंतिम सामना ठरण्याची शक्यता असल्याची चर्चा होती. यापुढे भविष्यातील सामन्यांसाठी त्याची निवड ही त्याच्या सध्याच्या कामगिरीवरून होईल, आत्तापर्यंतच्या विक्रमांवरून नव्हे तर असे निवड समितीद्वारे स्पष्ट करण्यात आल्याचे वृत्त होते.
सध्या सचिन चाळीशीत आहे. गेल्या १२ कसोटी सामन्यांत त्याने फक्त दोनवेळा अर्धशतक झळकावले आहे. तर २०११ सालच्या शतकानंतर त्याने एकही शतक झळकावलेले नाही. याच गोष्टींच्या पार्श्वभूमीवर त्याच्या निवृत्तीच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र, पाटील यांनी खुलासा केल्याने याला कलाटणी मिळाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.