एन.श्रीनिवासन खुर्ची सोडा, गावस्करांना अध्यक्ष करा- सुप्रीम कोर्ट

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी अध्यक्षपद सोडावे आणि या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांना हंगामी बीसीसीआयचे अध्यक्षपद सोपविण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 27, 2014, 01:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी अध्यक्षपद सोडावे आणि या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांना हंगामी बीसीसीआयचे अध्यक्षपद सोपविण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. या प्रकरणी बीसीसीआयला उद्यापर्यंत उत्तर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने आज सुनावणीत दिले आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सने चौकशी पूर्ण होईपर्यंत आयपीएल खेळू नये, अशाही टीप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे.
आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. परंतु, कोणताही निर्णय होऊ शकला नाही. बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना पदावरुन बाजूला होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली 48 तासांची मुदत आज संपली. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची मुक्त आणि नि:पक्षपाती चौकशी होण्यासाठी श्रीनिवासन यांनी अध्यपद सोडणं आवश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी दिले होते.
याप्रकरणी बीसीसीआयनं सुप्रीम कोर्टाकडे नवा प्रस्ताव पाठवला असून एन. श्रीनिवासन यांच्याजागी प्रभारी अध्यक्ष निवडावा आणि चौकशीत श्रीनिवासन दोषी न आढळल्यास ते पुन्हा अध्यक्षपद स्वीकारु शकतील असं या प्रस्तावात म्हटलंय...तसंच या प्रस्तावानुसार ते जूनपर्यंत आयसीसीचे चेअरमनही राहू शकतात... यावर कोर्टाने निर्णय देत गावस्कर यांना हंगामी अध्यक्ष बनविण्याच्या सूचना केल्या आहेत.
एन. श्रीनिवासन यांच अध्यक्षपद आज जाणार हे जवळपास निश्चित होते. आता बीसीसीआयच्या अध्यक्षस्थानी कोण स्थानाप्पन होणार याकडे तमाम क्रिकेटविश्वाच लक्ष लागून राहिल होते. यामध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष शिवलाल यादव यांच्यापैकी एकाची बीसीसीआयच्या अध्यक्षस्थानी निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने सुनील गावस्कर यांचे नाव हंगामी अध्यक्ष म्हणून सूचविले आहे.
इंडिया सिमेंटशी संबंधीत कोणीही आयपीएलमध्ये असू नये, अशीही सूचना सुप्रीम कोर्टाने केली आहे.
आयपीएल रद्द करावी
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी स्पॉटफिक्सिंग प्रकरणाची सीबीआय चौकशी होईपर्यंत आयपीएल स्पर्धा बरखास्त करण्याची मागणी केलीय. स्पॉट फिक्सिंग, सट्टेबाजी सारख्या प्रकारामुळे लोकांचा खेळावरील विश्लास उडालाय. हा विश्वास परत मिळवण्यासाठी सर्व आयपीएल सामन्यांची सखोल सीबीआय चौकशी होणं आवश्यक आहे. समोर आलेल्या गोष्टी य़ा हिमनगाचे वरचे टोक असू शकतात,असंही मनोहर यांनी म्हंटलंय. मनोहरप्रमाणेच बीसीसीआयचे आणखी एक माजी अध्यक्ष आयईएस बिंद्रा यांनीही श्रीनिवासन यांच्यावर हल्लाबोल केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.