www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
झी मराठीवरील सारेगमप 2014 ची महाविजेती ठरलीये पुण्याची जुजो. अर्थात जुईली जोगळेकर. ग्रॅण्ड फिनालेमध्ये टॉप पाच स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली. मात्र अखेर बाजी मारली ती पुणेरी पुणेकर जुईली जोगळेकरने.
सारेगमप सूर नव्या युगाचा या बाराव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा ठाण्यात पार पडला. या महाअंतिम सोहळ्यात पुण्याच्या ज्युईली जोगळेकर हिनं बाजी मारलीय. यावेळी हरिहरन यांच्या हस्ते विजेती ज्युईलीचा गौरव करण्यात आला.
या महाअंतिम सोहळ्यात सोलापूरचा जयंत पानसरे दुसरा, डोबिंवलीची रेश्मा कुलकर्णी तिस-या, कोल्हापूरचा प्रल्हाद जाधव चौथ्य़ा तर मुरबाडचा मुकेश कांते पाचव्या स्थानावर राहिला... सारेगमपच्या या पर्वात वेगळा साज चढवत गाणी सादर केल्यानं रसिकांची त्याला भरभरुन पसंती मिळाली.
सारेगमपच्या महाअंतिम सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी खास हजेरी लावली. याआधी सारेगमपमध्ये चमकलेल्या स्पर्धकांनी ड्युएट सादर केली. तर स्पर्धकांचे हे परफॉर्मन्स पाहून खुद्द प्रमुख पाहुणे असलेल्या हरिहरन यांनीही आपल्या जादूई आवाजाने एक वेगळीच मैफल सजवली.
सारेगमपच्या महाअंतिम सोहळ्यात बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकरच्या सुरांचीही जादू पाहायला मिळाली. सुपरहिट गाण्यांची त्यांनी जणू उपस्थितांना मेजवानीच दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.