दबंग टायगरचे दबंग बॉडीगार्डस्...

आपली ‘दबंग’गिरी रिअल लाईफमध्येही दाखवून नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून वादात सापडणारा अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पण, या वेळेस स्वतःच्या चुकांमुळे नाही तर त्याच्या बॉडिगार्डच्या करामतींमुळं…

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 2, 2012, 03:18 PM IST

www.24taas.com, मुंबई
आपली ‘दबंग’गिरी रिअल लाईफमध्येही दाखवून नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून वादात सापडणारा अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पण, या वेळेस स्वतःच्या चुकांमुळे नाही तर त्याच्या बॉडिगार्डच्या करामतींमुळं…
गेल्या दोन वर्षात तर फिल्मसमुळे सलमानला बरिच प्रसिध्दी मिळाली आहे. माहितीनुसार सलमान खानच्या बॉडिगार्डसनी एका गावातील काही रहिवाश्यांसोबत काही कारणांवरून वाद केला आणि मारामारी केली. सलमान खान त्याच्या आगामी चित्रपट ‘दबंग-२’चे शूटिंग करण्यासाठी पाचगणी जवळच्या गावी गेला होता. सातारचे एसपी के. एम. प्रसन्ना यांनी सांगितले की सलमान खान आणि त्यांची टीम चित्रपटाचे सिन शूट करण्यासाठी स्थानिक लोकांच्या मदतीनं स्थळ शोधत असताना हा वाद निर्माण झाला.
झालं असं की, सलमानला शूटसाठी एक विशिष्ट जागा हवी होती आणि त्यासाठी ग्रामस्थ त्यांना मदत करत होते. सलमानची टीम एसयूव्ही गाडीत होते तर त्याला मदत करणारे बाइकवर सवार होऊन त्याच्या पाठून येत होते. सलमाननं बाईकवर असलेल्या ग्रामीण तरूणांपैकी एकाची बाईक घेऊन त्याच्या टीमला पाठीमागून यायला सांगितलं. यावेळी इतर स्थानिकांनी बाईकवर असलेल्या सलमानला टेक ओव्हर करण्याचा प्रयत्न केला. सलमानच्या बॉडिगार्डची एसयूव्हीच्या पुढे जाऊन त्यांनी सलमानचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बॉडिगार्ड सलमानच्या सुरक्षतेसाठी पुढे सरकावले आणि त्यांच्या गाडीचा धक्का बाईकवर असलेल्या ग्रामस्थांना लागला आणि ते खाली पडले.
यावरून सलमान खानबरोबर असलेली टीम आणि ग्रामस्थांमध्ये थोडा वाद झाला. यावेळी, ग्रामस्थांनी एसयूव्ही गाडीचालकाला खाली उतरवून मारहाण केल्याचं सलमानच्या टीममधील एका व्यक्तीनं म्हटलंय. दरम्यान, दोन्ही पक्षांपैकी कुणीही तक्रार दाखल केलेली नाही.