कॉलेज कट्ट्यावरची ‘दुनियादारी’

कॉलेज, कट्टा आणि धमाल या सगळ्यांचा एकत्रित मेळ म्हणजे दुनियादारी. सुहास शिरवाळकर यांच्या ‘दुनियादारी’ या पुस्तकावर आधारित असा हा चित्रपट १९ जुलैला रिलीज झालाय

Updated: Jul 19, 2013, 07:02 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
कॉलेज, कट्टा आणि धमाल या सगळ्यांचा एकत्रित मेळ म्हणजे दुनियादारी. सुहास शिरवाळकर यांच्या ‘दुनियादारी’ या पुस्तकावर आधारित असा हा चित्रपट १९ जुलैला रिलीज झालाय. पुस्तकावर आधारित बरेच सिनेमे झाले आणि गाजलेही. चेकमेट, रिंगा रिंगा आणि फक्त लढ म्हणा या यशस्वी चित्रपटांनंतर संजय जाधव यांचा दुनियादारी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.
चित्रपटाची कथा
चित्रपटाचे इतके प्रोमो पाहिल्यानंतर तुम्हाला कळलेच असेल की चित्रपटाची कथा मैत्रीवर आधारित आहे. नित्या (राजेश भोसले), अशक्या (अजिंक्य जोशी), सुनील (प्रणव रावराणे), श्री (योगेश शिरसाट) आणि उम्या (अमित बेंद्रे) ही एस.पी. कॉलेजमधली कट्टागँग. दिग्या म्हणजेच दिगंबर शंकर पाटील(अंकुश चौधरी) हा त्या कट्टागँगचा प्रमुख. श्रेयस तळवलकर(स्वप्नील जोशी) हा मुंबईहून पुण्याला शिकायला आलेला आहे. काही कारणामुळे दिग्याकडून श्रेयसला मार बसतो आणि हीच संधी साधून दिग्याचा शत्रू साईनाथ देडगांवकर (जितेंद्र जोशी) हा श्रेयशसी सलगी वाढवण्याचा प्रय़त्न करतो. परंतु, श्रेयस समजुतदार असल्यामुळे साईनाथचे काही फावत नाही. याच प्रसंगामुळे दिग्या आणि श्रेयस एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यांच्यात घट्ट मैत्रीचे धागे बांधले जातात. कट्टागँगमध्ये आता श्रेयसही सामील होतो. याचवेळी त्यांची भेट होते शिरीन आणि प्रीतम या दोन भावंडांशी आणि मग दिग्या (अंकुश चौधरी), श्रेयस (स्वप्नील जोशी), मनू (उर्मिला कानेटकर), सुरेखा (रिचा पेरियल्ली), शिरीन (सई ताम्हणकर) आणि प्रीतम (सुशांत शेलार)यांची अशक्या, नित्या या सगळ्यांबरोबर एक धमाल गँग तयार होते. या मैत्रीमध्ये पुढे कशी धमाल, मजा, मस्ती, होते तसेच त्यातील प्रेमकथा कशा फुलत जातात हे सर्व या चित्रपटात बघायला मिळते.
कलाकारांचा अभिनय
स्वप्नील आणि अंकुश हे संजयचे चित्रपटातील खास मोहरे. त्यांचा अभिनय तर नेहमीप्रमाणेच उत्तम झालाय. तसेच बाकी कलाकारांचा अभिनय सुंदर आहे. संदीप कुलकर्णी, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, उदय सबनिस आणि नागेश भोसले यांनीही कलाकारांना छान साथ दिलीय. सई आणि उर्मिला यांनी त्यांना दिलेल्या भूमिकेला योग्य न्याय दिलाय.
संगीत
ब्रेकअप के बाद फेम ब्रॅन्ड, पंकज पडघन आणि अमितराज यांनी या चित्रपटासाठी संगीत दिलंय. तरुणांना रुचेल असे सुंदर संगीत त्यांनी दिलंय. ‘जिंदगी’ या गाण्याने तर तरुणांच्या मनावर राज्य केलंय. हे गाण चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अकरा कलाकारांनी गायले आहे.
दिग्दर्शन आणि बरेच काही
संजय जाधव फारच उत्तम पद्धतीने याचे दिग्दर्शन केलंय. ८०च्या दशकाचा काळ उभारण्यात दिग्दर्शकाला बऱ्यापैकी यश आलंय. त्यांचे गेटअप आणि ८० च्या दशकातले रेट्रो लूक चांगले झाले आहेत. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद चिन्मय मांडलेकर यांनी लिहिले आहेत.

का पाहाल चित्रपट?
कॉलेजचे दिवस, त्यावेळची धमाल, कट्ट्यावर केलेली मजा, मस्ती जर पुन्हा एकदा अनुभवायची असेल तर नक्की पाहा. कारण हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.