www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड भारताची सृष्टी राणा हिला मिळालेला मुकुट हा खोटा असल्याचं कळतंय. २०१३ची मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड बनण्याचा मान भारताच्या सृष्टी राणाला मिळाला. नुकतीच तिनं ही स्पर्धा जिंकलीय. मात्र मुकुट खोटा असल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटेल.
मिळालेल्या माहितीनुसार सृष्टी राणा ही काल मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. ती दक्षिण कोरियाहून ही स्पर्धा जिंकून पहिल्यांदाच भारतात परतली. मात्र तेव्हा कस्टम अधिकाऱ्यांनी तिनं कस्टम ड्यूटी न भरल्यानं पकडलं आणि मुकुट जप्त केला.
भारतीय कायद्यानुसार कोणत्याही सौंदर्य स्पर्धेत जिंकलेला मुकुटला कस्टम ड्यूटीमधून सूट मिळत नाही. तेव्हा सृष्टीनं किती रुपये कस्टम ड्यूटी भरायची हे संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं असता, मुकुटाची तपासणी करण्यात आली. तेव्हा हे लक्षात आलं की, मुकुटातील हिरे हे खोटे आहेत. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. हा मुकुट हिरेजडीत नसून तो काच आणि साध्या मेटलनं बनवलेला असल्याचं समोर आलंय.
त्यामुळं एअर इंटेलिजन्स युनिटनं (AIU) सृष्टी राणाला कस्टम ड्यूटी न भरताच जावू दिलं. आता सृष्टी राणा याबाबत काय करते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विशेष म्हणजे अशा प्रकारची फसवणूक करणं हे सौंदर्यस्पर्धा आयोजित करणाऱ्यांना शोभतं का, असा सवालही उपस्थित होतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.