www.24taas.com, मुंबई
करीना कपूर बॉलिवूडमधली अतिशय दुर्मिळ अशा `टॅलेंटेड अॅक्ट्रेस` पैकी एक म्हणून ओळखली जाते. निवडलेली भूमिका पूरेपूर ताकदीनं पूर्ण करण्यासाठी ती कोणतीही कसर बाकी ठेवत नाही. यामुळे तिची प्रत्येक भूमिका पडद्यावरही तेव्हढीच जिवंत होते पण तिचा हाच हट्टीपणा तिला सध्या थोडा भारी पडलेला दिसतोय.
करीना कपूर सध्या पुनीत मल्होत्राच्या दिग्दर्शित ‘गोरी तेरे प्यार में’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात ती इम्रान खानसोबत पुन्हा एकदा दिसणार आहे. याच चित्रपटातील एक दृश्यं करताना करीना जखमी झालीय.
झालं असं की, या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एका दृश्यात करीनाला कोणत्याही आधाराविना एका ‘रोप’वरून (दोरीवरून) चालायचं होतं. प्रोडक्शनबरोबर झालेल्या करारानुसार, तिला या स्टंटसाठी एखाद्या व्यक्तीची आवश्यकता असेल तर ती पुरवण्यास प्रोडक्शननं तयारी दर्शवली. परंतू, करीनानं मात्र हा स्टंट स्वत:च करण्याचा निर्णय घेतला.
हे दृश्यं चित्रीत करताना ती पूर्ण काळजी घेत होती, परंतू तिचा पाय जाडसर दोरीला घासला आणि ती जखमी झाली. एखाद्या जळालेल्या भागाप्रमाणे तिचा पाय यावेळी दिसत होता आणि त्यातच तळपत्या सूर्यानंही तिला साथ दिली नाही. परंतू तरीही करीनानं हे दृश्यं पूर्ण केलंच, अशी माहिती चित्रीकरणाच्या वेळी उपस्थित असलेल्या एका सूत्रानं दिलीय.
इम्रान आणि करीना यापूर्वी एक मैं और एक तूं या चित्रपटातही एकत्र दिसले होते. करीना लवकरच बरी व्हावी यासाठी सगळेच तिला म्हणतायत, ‘गेट वेल सून करीना!’