www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्ली उच्च न्यायालयानं आगमी हिंदी सिनेमा `गुलाब गँग`च्या प्रदर्शन बुधवारी स्थगित करण्याचे आदेश दिलेत. हा सिनेमा कथित स्वरुपात उत्तरप्रदेशातील सामाजिक कार्यकर्त्या संपत पाल यांच्या जीवनावर आधारित आहे. पाल यांनी प्रत्यक्षात सामाजातील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी महिलांची फौज तयार केलीय, या संघटनेचं नाव गुलाबी गँग आहे.
न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांनी सिनेमाच्या प्रदर्शन स्थगित करण्याचे आदेश दिलेत. या सिनेमाचं प्रदर्शन झालं तर संपत पाल यांच्या कामाला धक्का लागेल, असं त्यांनी म्हटलंय. यापूर्वी न्यायाधीशांनी, याचिका दाखल करण्यासाठी एवढा वेळ का लावला? असा सवाल संपत पाल यांना केला होता.
संपत पाल यांनी बुधवारी सिनेमाचं प्रदर्शन रोकण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. सिनेमा निर्मात्यांनी सिनेमा बनवण्यापूर्वी आपली अनुमती घेतली नव्हती. `सिनेमाची नायिका आपली भूमिका निभावतेय आणि सिनेमाच्या प्रोमोत आपल्याला चुकीच्या पद्धतीनं दाखवलं जातंय. य़ामुळे आपल्या इमेजला धोका पोहचतो` असं पाल यांनी म्हटलंय. याच्या भरपाईसाठी त्यांनी निर्मात्यांकडे आर्थिक नुकसान भरपाईचीदेखील मागणी केलीय.
`इमेज, श्रेय एकदा गमावलं की ते पुन्हा मिळवता येत नाही. पैशांनी त्याची भरपाई होऊ शकत नाही` असं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलंय.
अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला अभिनीत `गुलाब गँग` हा सिनेमा येत्या ७ मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. नवोदित दिग्दर्शक सौमिक सेन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय तर अनुभव सिन्हा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.