www.24taas.com, मुंबई
सिनेक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते अवतार कृष्ण हंगल ऊर्फ ए. के. हंगल यांचं निधन झालयं. वृध्दापकाळानं मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालयं. मृत्यूसमयी ते ९५ वर्षांचे होते.
सांताक्रुझ इथल्या आशा पारेख रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. १३ ऑगस्टला घरी असताना हंगल घसरून पडले. यावेळी त्यांच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यानंतर पाठदुखीचा त्रास असह्य झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. छातीतही दुखत असल्याने त्यांना श्वास घेण्यातही त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांना आशा पारेख हॉस्पिटलमधल्या आयसीयू विभागात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण वयोमानानुसार त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणं शक्य नव्हतं. सुरुवातीला त्यांना वेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं. अस्थमा आणि किडनीच्या त्रासामुळे ते गेली अनेक वर्षे त्रस्त होते.
ए के हंगल यांनी जवळपास २०० सिनेमांमध्ये काम केलंय. नमक हराम, शोले, शौकीन, आईना या सिनेमांतील त्यांची छोटी भूमिकाही उल्लेखनीय ठरली. अलीकडेच त्यांनी कलर्स या वाहिनीवरील ‘मधुबाला’ या मालिकेत पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. त्यांची शोले सिनेमामधली रहिम चाचाची भूमिका विशेष लक्षणीय ठरलीय. ‘इतना सन्नाटा क्यों है भाई’ म्हणणारे ए. के. हंगल आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत.