www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येच्या घटनेचा तपास नव्याने करावा लागणार आहे. उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की, वरिष्ठ पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिकार्यामार्फत नव्याने तपास करावा. तसे उच्च न्यायालयाने पोलिसांना आदेश दिले आहेत.
जियाची आई रबिया खान हिने जिया खान आत्महत्येचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र, ही मागणी न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. परंतु रबिया खान यांचा जबाब नव्याने नोंदवण्यात यावा. शिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिकार्यामार्फत नव्याने तपास करावा, असा आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला आहे.
३ जून रोजी जिया खान हिने आत्महत्या केली होती. अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा सूरज पांचोली व जिया यांचे प्रेमसंबध होते. परिणामी पोलिसांनी या आत्महत्येप्रकरणी सूरजला अटक केली होती. त्यानंतर त्याची जामिनावर मुक्तताही झाली होती. याबाबत जियाच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत सीबीआयमार्फत चौकशीची मागणी याचिकेत केली होती.
२६ तारखेपूर्वी जियाच्या आईचा जबाब जुहू ठाण्यात नोंदविण्यात यावा. तिच्या आत्महत्येसंदर्भातील वस्तुस्थिती नव्याने जाणून घ्यावी. आईने दिलेल्या पुराव्यांच्या आधारे तपास करावा आणि आवश्यकता भासल्यास नवीन कलमांचा समावेश करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.