www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
येत्या ७ मार्चला माधुरीचा `गुलाबी गँग` प्रदर्शित होतोय. जसजशी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येतेय तसतसा संपत पाल यांचा पारा वाढत चाललाय. `माझ्या परवानगीशिवाय चित्रपट प्रदर्शित केला तर मी अण्णा हजारेंसारखी उपोषणाला बसेन` असा पवित्रा संपत पाल यांनी घेतलाय.
यामुळे, माधुरी दीक्षित आणि जुही चावला अभिनित `गुलाबी गँग` हा बहुचर्चित चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. `गुलाबी गँग` संपत पाल यांच्या जीवनावर आधारित आहे, असं म्हटलं जातंय. संपत पाल यांनी उत्तरप्रदेशाच्या बुंदेलखंड येथील महिलांना संघटीत करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला होता.
`गुलाबी गँग` चित्रपटाच्या विरूद्ध संपत पाल यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना संपत पाल यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. `माझ्या परवानगीशिवाय माझ्या जीवनावर चित्रपट निघतो कसा?` असा संपत पाल यांचा सवाल केलाय. ७ मार्चला रिलीज होणाऱ्या `गुलाबी गँग`विरूद्ध २ मार्चला मी अण्णा हजारेंसारखे उपोषणाला बसेन, असा इशारा संपत पाल यांनी दिला. महिलांच्या ताकदीचा अंदाज अनुभव सिन्हा यांना नाही त्यामुळेच त्यांनी आपली परवानगी घेतली नाही, असं पाल यांनी यावेळी म्हटलंय.
संपत पाल या माधुरी दीक्षितवर देखील चांगल्याच नाराज असल्याचं दिसतंय. `आयुष्यभर हा लढा आपण लढलो... आणि आता तो पडद्यावर दाखवून त्याचं प्रोडक्ट बनवून विकलं जातंय... आपला संघर्ष पडद्यावर दाखवण्यासाठी दोन कोटी मानधन घेतलं जातं. आपल्या देशाचा सारा पैसा अशाच कामात खर्च होतो` असं म्हणत संपत पाल यांनी आपला या चित्रपटाला विरोध दर्शविलाय.
`गुलाबी गँग`चे दिग्दर्शक सौमिक सेन यांनी मात्र पाल यांच्या आरोपांचा इन्कार केला आहे. चित्रपट पूर्णपणे काल्पनिक आहे. संपत पाल यांचा आणि कथेचा काहीही संबंध नाही. `गुलाबी गँग` चित्रपटात साड्यांचाही रंग गुलाबी नाही. चित्रपटावर आक्षेप घेण्यापूर्वी संपत पाल यांनी चित्रपट पाहायला हवा होता, असं सौमिक सेन यांनी स्पष्ट केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.