फिल्म रिव्ह्यू : फटा पोस्टर, निकला हिरो

राजकुमार संतोषी यांना आपण दामिनी, घायल, घातक किंवा द लेजंड ऑफ भगत सिंगसारख्या गंभीर चित्रपटांसाठी ओळखलं जातं. तसंच ‘अंदाज अपना अपना’ या विनोदी चित्रपटासाठीही त्यांचं खूप कौतुक झालं होतं. हेच राजकुमार संतोषी आता प्रेक्षकांसाठी ‘फटा पोस्टर, निकला हीरो’ हा आणखी एक विनोदी चित्रपट घेऊन आलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 20, 2013, 09:02 PM IST


www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सिनेमा : फिल्म रिव्ह्यू : फटा पोस्टर, निकला हिरो
दिग्दर्शक : राजकुमार संतोषी
कलाकार : शाहीद कपूर, इलियाना डिक्रूझ

राजकुमार संतोषी यांना आपण दामिनी, घायल, घातक किंवा द लेजंड ऑफ भगत सिंगसारख्या गंभीर चित्रपटांसाठी ओळखलं जातं. तसंच ‘अंदाज अपना अपना’ या विनोदी चित्रपटासाठीही त्यांचं खूप कौतुक झालं होतं. हेच राजकुमार संतोषी आता प्रेक्षकांसाठी ‘फटा पोस्टर, निकला हीरो’ हा आणखी एक विनोदी चित्रपट घेऊन आलेत.
काय आहे कथानक
आपल्या मुलानं पोलीस इन्स्पेक्टर व्हावं, ही एका आईची इच्छा... मुलाला –विश्वास रावल - मात्र हिरो बनण्याची स्वप्न पडतायत. अखेर विश्वास आईशी खोटं बोलून मुंबईत दाखल होतो. इथं त्याची ओळख होते अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या एका मुलीसोबत (इलियाना डिक्रूझ)... ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमात होतं आणि मग पुढे नेहमीचेच प्रसंग येत राहतात. आयटम साँग, मारामारी, विनोद आणि गाणी यांच्या भरमसाठ माऱ्यात कथानक मात्र भरकटत जातं. प्रयत्न चांगला असला तरी हा चित्रपट काही प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करत नाही. नेहमीचच कथानक असलेला हा चित्रपट विनोदनिर्मितीत पूर्णपणे फसला आहे, असंच म्हणावं लागेल.
कॉमेडी चित्रपट?
विनोदी चित्रपटाला लागणारा सगळा मसाला या चित्रपटात आहे. मात्र, तरीही चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजनाची भूक क्षमविण्यास अपुराच पडतो. चित्रपटातील काही प्रसंग आणि पात्र विनाकारणच असल्याचं जाणवतं. चित्रपटातील काही मोजक्याच प्रसंगांतून दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा चित्रपट आपण बघतोय याची जाणीव होते. अनेक ठिकाणी प्रेक्षकांना कंटाळवाणी वाटणारे प्रसंग येत राहतात.
जमेच्या बाजू
शाहीद कपूरने मात्र, अभिनयात चुणूक दाखवली आहे. त्याचं संपूर्ण चित्रपटात बिनधास्त वावरणं प्रेक्षकांना आवडतं. कॉमेडी आणि अॅक्शन सीन्समध्येही तो चांगलाच भाव खावून गेलाय. सलमान खाननंही या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारलीय.

एकूण काय तर...
एकंदरीत, हा चित्रपट खूप कमाई करून ब्लॉकबस्टर श्रेणीत जाणारा नसला तरी निर्मात्यांना तोटा होईल, असादेखील नाही. सध्याचे कॉमेडी चित्रपट पाहता, संपूर्ण कुटुंबासोबत पाहता येईल असा हा कॉमेडी चित्रपट आहे असं जरुर म्हणावं लागेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.