www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पुनीत मल्होत्रा निर्मित ‘गोरी तेरे प्यार में’ हा सिनेमा शुक्रवारी चित्रपटगृहांत झळकलाय. सिनेमाचा पहिला अर्धा भाग पाहून तुम्हाला पुनीतच्या ‘आय हेट लव्ह स्टोरी’ची नक्कीच आठवण होईल. पुनीत अजून जुन्या सिनेमातून बाहेर पडला नाही, असंही तुम्हाला वाटून जाईल. या सिनेमातही तुम्हाला ‘आय हेट लव्ह स्टोरी’ सारखेच संवाद आणि गुदगुल्या करणाऱ्या शब्दपंक्ती ऐकायला मिळतील.
काय आहे सिनेमाची कथा…
श्रीरामचं (इमरान खान) संपूर्ण कुटुंब बंगळुरूला स्थायिक आहे. श्रीरामचे वडील शहरातले प्रसिद्ध बिल्डर आहेत. वडिलांच्या मते, श्रीरामनंही आपल्या मोठ्या भावाप्रमाणेच घरच्या बिझनेसला पुढे न्यावं. पण, श्रीराम मात्र आपल्या भावापेक्षा अगदी विरुद्ध आहे. त्याला पार्ट्यांमध्ये आणि गर्लंफ्रेंडसोबत मौज-मस्ती करण्याचं जास्त वेड आहे. आपल्या वडिलांच्या पैशावर उधळपट्टी करण्याची त्याला सवयच लागलीय.
दीया (करीना कपूर) आपल्या दिल्लीत स्थायिक असलेल्या कुटुंबापासून वेगळी राहून बंगळुरूमध्ये एका एनजीओसोबत काम करतेय. अचानक, एके दिवशी श्रीराम आणि दीया एकमेकांसमोर येतात. त्यांच्या भेटीत जाणवतं की दोघंही एकमेकांपासून अगदी विरुद्ध आहेत. पण, आणखी काही भेटीनंतर ते एकमेकांना समजून घ्यायला लागतात आणि मग, श्रीराम दिल्लीत दीयाच्या कुटुंबीयांना भेटून दीयासोबत लग्नाची परवानगी मागण्यासाठी दाखल होतो. पण, या दरम्यान अशा काही घटना घडतात की या दोघांचेही रस्ते एकमेकांपासून विलग होतात.
श्रीराम आणि दीयाच्या या लव्ह स्टोरीसोबत सिनेमात वसुधा (श्रद्धा कपूर) आणि श्रीरामच्या लग्नाच्या प्लॉटलाही कथेचा महत्त्वाचा भाग बनवण्यात आलंय. कुटुंबीयांच्या निर्णयासमोर ‘री’ न ओढणाऱ्या वसुधा मात्र एका शिख युवकाच्या प्रेमात पडलीय. तिच्यात आपल्या कुटुंबीयांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देण्याची हिंमत नाही. कमल, वसुधा आणि श्रीराम हे कथेतील तीन महत्त्वाचे पात्र आहेत.
भूमिका आणि अभिनय
अभिनयाचं म्हणाल तर, दीयाची भूमिका ही केवळ करीनासाठीच लिहिली गेलीय की काय? असं वाटावं इतकी उठावदार झालीय. दीयाच्या भूमिकेशी मिळती-जुळती भूमिका करीनानं प्रकाश झाच्या ‘सत्याग्रह’मध्येही निभावलीय. वसुधाच्या भूमिकेत श्रद्धा कपूर तिच्या ‘आशिकी’तील भूमिकेप्रमाणेच दिसलीय. इमरानचं म्हणाल तर तोही, त्यानं यापूर्वी अनेक सिनेमांत केलेल्या आपल्या जुन्याच भूमिकांप्रमाणे दिसलाय.
सिनेमाची गती...
सिनेमाच्या कथेनुसार सिनेमाचा दिग्दर्शक धावताना दिसतोय त्यामुळे संपूर्ण सिनेमाची गती मंदावलीय. पण, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात पुनीत यशस्वी ठरलाय. करीना आणि इमरानची जोडी यंगस्टर्ससाठी आकर्षक ठरलीय
संगीत
विशाल-शेखरचं संगीत कथा आणि वातावरणाशी चांगलंच जुळलंय. ‘गोरी तेरे प्यार में’ आणि ‘इन दिनों’ ही गाणी लोकप्रियही ठरलीत. सिनेमाची कथा एका प्रेमकहाणीवर आधारीत आहे, त्यामुळे प्रेक्षक खिळून राहतात.
हा सिनेमा एकदा पाहण्यास काहीच हरकत नाही...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.