'युती' इतिहासजमा... उरल्या फक्त आठवणी!

शिवसेना भाजपची 25 वर्षांची युती तुटलीय. भाजप सेना युतीचा गेल्या पाव शतकाचा काळ म्हणजे जणू महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा काळ... आता इतिहास झालेल्या युतीच्या प्रवासाची काही क्षणचित्रांची, ही आठवण... 

Updated: Sep 26, 2014, 03:09 PM IST

प्रकाश दांडगे
झी प्रतिनिधी

शिवसेना भाजपची 25 वर्षांची युती तुटलीय. भाजप सेना युतीचा गेल्या पाव शतकाचा काळ म्हणजे जणू महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा काळ... आता इतिहास झालेल्या युतीच्या प्रवासाची काही क्षणचित्रांची, ही आठवण... 

भाजप-शिवसेना युती आता इतिहासजमा झाली आहे...
हिंदुत्वाच्या आणाभाका एकत्र आलेल्या भाजप आणि शिवसेनेनं काडीमोड घेतलाय...
आमची युती अभंग आहे... असं शेवटपर्यंत सांगणारे हे भगवे शिलेदार आता वेगळे झालेत...
सत्ता असो की विरोधी पक्ष... केंद्र सरकार असो की राज्य सरकार... राज्याचं विधीमंडळ असो की संसद.... गेली 25 वर्ष एकमेकांची साथ देणारे भाजप आणि शिवसेना आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत.
एकेकाळचे मित्र आता राजकीय वैरी बनलेत...

कधी प्रजा समाजवादी पक्ष तर कधी काँग्रेस असा सोईप्रमाणे राजकीय घरोबा करत प्रामुख्यानं मुंबईत शिवसेनेची राजकीय वाटचाल सुरु होती. याच प्रवासात शिवसेनेची नाळ खऱ्या अर्थानं जुळली ती आधी जनसंघाशी आणि नंतर भाजपशी...

1984 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक आणि मनोहर जोशी भाजपच्या कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढले पण त्यांना पराभव पत्करावा लागला... पण, 1985 सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची साथ सोडून, भाजप शरद पवारांच्या पुरोगामी लोकशाही दलात सामील झाली... तेव्हा भाजपला खास ठाकरी शैलीत बाळासाहेबांनी टोलाही लगावला होता.


'युती'च्या इतिहासातला एक क्षण

एकमेकांपासून दूर गेलेल्या भाजप-सेनेला जवळ आणलं ते हिंदुत्वानं... देशात हिंदुत्वाचे वारे वाहत असतांना राज्यभर विस्तारत असलेल्या शिवसेनेला साथीला घेणं गरजेचं आहे याची जाणिव भाजपच्या धुरंधरांना होत होती.

अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी यांचा ऐन भराचा तो काळ... प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वाच्या मुद्दावर एकत्र येण्याची गरज शिवसेनाप्रमुखांना पटवून दिली आणि 1989 मध्ये भाजप-सेना युती साकारली. या युतीचे मुख्य शिलेदार होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन...

त्याच वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे चार खासदार विजयी झाले. 1990 ची विधानसभा निवडणूक ही युतीची पहिली निवडणूक... त्यात शिवसेनेचे 52 तर भाजपचे 42 आमदार विजयी झाले. सत्तेनं शिवसेना भाजपला हुलकावणीच दिली. पण युतीची ताकद वाढत चालली होती.

1990 ते 1995 हा होता भाजप-सेना युतीचा संघर्षाचा काळ.. सत्तेबाहेर असलेल्या युतीच्या नेत्यांनी शरद पवारांच्या काँग्रेस सरकारला धारेवर धरलं होतं राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष यात्रा काढली... नवी दिल्लीत प्रमोद महाजन आणि महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या हाती भाजपची सूत्रं होती... वाजपेयी आणि अडवानी यांचा करिश्मा होता... तर शिवसेनेवर फक्त आणि फक्त शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरेंचा रिमोट कंट्रोल चालत होता.
 
अखेर युतीच्या इतिहासातला सुवर्ण क्षण साकारला...

1995 मध्ये मंत्रालयावर भगवा फडकला... शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले... युतीत अडचणी नव्हत्या असे नाही... पण युतीतले सगळे वाद मिटवायला बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांची मैत्री भक्कम होती... कुठलाही वाद झाला किंवा शिवसेना नाराज झाली की भाजपचे नेते मातोश्रीवर धाव घेत आणि शिवसेनाप्रमुखांची समजूत घालत... 1999 मध्ये केंद्रात एनडीएची सत्ता आली आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. सेनेच्या वाटयाला केंद्रीय मंत्रीपदंही आली... 2002 मध्ये तर लोकसभेचं अध्यक्षपदही शिवसेनेच्या मनोहर जोशींकडे आलं. सेना भाजप युतीचा तो सुवर्ण काळ होता... 


'युती'च्या इतिहासातला एक क्षण

पण पुढे काळ बदलत गेला.. पिढया बदलत आणि भाजप आणि सेनेतली समिकरणंही बदलत गेली..इकडे शिवसेनेतला अंतर्गत संघर्ष तीव्र होत होता. 2003 च्या महाबळेश्वर शिबीरात उद्धव ठाकरेंची कार्यध्यक्षपदी निवड झाली आणि उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांचे उत्तराधिकारी असणार हे स्पष्ट झालं. शिवसेनेत अंतर्गत कलह सुरु झाला होता. 2005 मध्ये नारायण राणे यांनीही काँग्रेसची वाट धरली... 2006 मध्ये राज ठाकरेंनी बाहेर पडत स्वत:चा पक्ष काढला. भाजप-सेनेत नेतृत्वाच्या पिढया बदलल्या तसा संवादही तुटत गेला... युतीचे शिल्पकार असलेले प्रमोद महाजनही काळाच्या पडद्याआड गेल्यानं युतीतला संवादाचा दुवा निखळून पडला होता. भाजपतही नेतृत्वबदलाचे वारे वहात होते. गोपीनाथ मुंडे,नितीन गडकरी, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यांच्या हातात आता भाजपची सूत्रं होती तर दुसरीकडे शिवसेनेची सूत्रं उद्धव ठाकरेंच्या हातात देण्याचा निर्णय शिववसेनाप्रमुखांनी घेतला होता. सगळं काही आलबेल नसतानाच आलेल्या 2009 च्या निवडणुकीत सेना भाजप युतीला अपयश आलं. केंद्रात तसचं राज्यात सत्तेनं हुलकावणी दिली...

2009 ते 2014 हा युतीसाठी कसोटीचा काळ ठरला... राज्यातील नेत्यांचा मातोश्रीची संवाद कमी होत असतानाच शिवसेनाप्रमुखांशी स्नेहाचे संबंध असलेले अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी यांचं नेतृत्व अस्ताला चाललं होतं... भाजपच्या राजकारणात नरेंद्र मोदी नावाचा नवा तारा चमकू लागला होता. भाजपही आता शत प्रतिशतची भाषा करु लागला होता... असं असलं तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत मातोश्रीची ताकद कायम होती... नरेंद्र मोदींसह सगळे मोठे नेते मुंबई भेटीत मातोश्रीवर जात होते... 

शिवसेनाप्रमुखांचं निधन झाल्यानंतर भाजपचा पवित्रा आक्रमक झाला. शत प्रतिशत भाजपची भाषा होऊ लागली. महाराष्टात धाकटा भाऊ असलेल्या भाजपला युतीत थोरला भाऊ होण्याची घाई झाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या लाटेवर स्वार होत भाजपनं केंद्रात पूर्ण बहुमत मिळवलं आणि मग 'अब महाराष्ट्र सब महाराष्ट्र' म्हणत अमित शहांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपनं लढाऊ रुप धारण केलं.

...तर इकडे स्वबळावर महाराष्ट्र काबीज करण्याची स्वप्न भाजपबरोबरच सेनेलाही पडू लागली होती. तरीही सेना भाजप युती तुटेपर्यंत संबंध ताणले जाणार नाही असं चित्र होतं... गोपीनाथ मुंडेंसारखे युतीला बांधून ठेवू शकणारे नेते भाजपमध्ये होते. पण गोपीनाथ मुंडेचं अपघाती निधन झालं आणि युती सैरभैर झाली. युती टिकवणारा अखेरचा चिराच निखळून पडला होता. भाजप-सेनेच्या मनात घटस्फोट घेऊन स्वबळावर लढण्याचे विचार जोर धरायला लागले होते. मग पार पडली ती घटस्फोटाची औपचारिकता... 

भाजपचे अध्यक्ष अमित शाहांच्या मातोश्री भेटीवरुन झालेलं शह-काटशहाचं राजकारण... चिघळत गेलेला जागावाटपाचा वाद, तोंडदेखल्या चर्चेही गुऱ्हाळे आणि एकमेकांनी नाकारलेले जागांचे फॉर्म्यूले... सगळं काही युतीचा संसार संपल्याचं स्पष्ट करत होतं. युतीच्या संसारासाठी कोणी किती खस्त्या खाल्या याची जाहिरपणे दिलेली जंत्री दिली जात होती. शेवटी वाद विकोपाला गेले आणि भाजप-शिवसेना युती इतिहासजमा झाली. हिंदुत्वाच्या धाग्यानं बंधनात अडकलेले भगवे शिलेदार मुक्त झाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.