स्त्रियांसाठी... झाले 'मोकळे' आकाश!

Updated: Oct 28, 2015, 04:51 PM IST
स्त्रियांसाठी... झाले 'मोकळे' आकाश! title=

हेमंत महाजन
माजी ब्रिगेडियर 

वायुदलाचा वर्धापनदिन भारतीय महिलांना जबरदस्त खुषखबर देणारा ठरला आहे. हवाईदलप्रमुख एअरचीफ मार्शल अरुप राहा यांनी स्त्रीशक्तीला पराक्रमाचे नवे आकाश खुले करून दिले आहे. महिलांना लढाऊ वैमानिक होण्याची संधी देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. सर्व क्षेत्रात महिलांनी कर्तृत्वाचे झेंडे रोवले; पण हवाईदलात लढाऊ विमानांचे सारथ्य करण्याची जबाबदारी अद्यापपर्यंत स्त्रियांवर सोपवली गेली नव्हती. आता त्याबाबतचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठवला गेला आहे. 

हा निर्णय अंमलात येईल तेव्हा महिला वैमानिकांना आजवर बंद असलेले युद्धाचे आकाश ‘मोकळे’ होईल. भारतीय संरक्षण दलांमधील धाडसी, कर्तृत्ववान महिलांना नाकारली गेलेली लढण्याची ‘समान संधी’ प्राप्त होऊ शकेल. लढण्याची ‘समान संधी’ भारतीय हवाई दलातील महिला वैमानिकांनादेखील लवकरच लढाऊ विमानांचे सारथ्य करण्याची संधी मिळणार आहे. 

आकाश झाले ठेंगणे!
यापूर्वी वाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टर्स पथकात महिलांचा समावेश होताच. शिवाय लॉजिस्टिक्स, एरॉनॉटिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, नेव्हिगेशन, हवामानशास्त्र अशा विभागांमध्ये महिला कार्यरत होत्याच. आज अमेरिका, इस्त्रायल, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान वायुसेनेत महिला लढावू विमाने चालवीत आहेत. प्रवासी विमाने चालविणाऱ्या महिलांची तर गणतीच नाही. अगदी जम्बो जेटपासून तर एअरबस महिला चालक चालवीत आहेत.

भारतीय वायुसेनेत महिलांना लढाऊ विमाने चालविण्यास मज्जाव का? हा प्रश्नत गतकाळात अनेकदा ऐरणीवर आला आणि त्यावर वायुसेनेत प्रदीर्घ काळ सेवा केलेल्या निवृत्त अधिकाऱ्यांनी आपापली मते त्या त्या वेळी व्यक्त केली होती. प्रामुख्याने युद्धाच्या वेळी जर शत्रूकडून विमान पाडले गेले आणि ते विमान जर महिला वैमानिक चालवीत असेल, तर काय घडू शकते याचा यावेळी विचार करण्यात आला. कारण, यापूर्वीचा पुरुष वैमानिकांचाच अनुभव अंगावर काटे आणणारा होता. १९७१ च्या युद्धातील अनेक युद्धकैदी अजूनही पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडले आहेत. काहींनी तर यातना सहन न झाल्यामुळे तेथेच शेवटचा श्वास घेतला. या भारतीय युद्ध कैद्यांमध्ये लढाऊ विमान चालकांचाही समावेश होता. त्यांचे पाकिस्तानने अतिशय हालहाल केले.

त्यावेळी श्रीमती इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या आणि पाकिस्तानचे ९३ हजार सैनिक भारताला शरण आले होते. पण, आपल्या जवानांची कोणतीही काळजी न करता, त्यांना पाकिस्तानच्या हवाली करण्यास इंदिरा गांधी या एक महिलाच जबाबदार आहेत. अशा सर्व अनुभवांचा विचार तसेच महिलांच्या आरोग्याशी निगडित अनेक बाबींचा ऊहापोह सातत्याने वायुसेनेत सुरू होता. प्रदीर्घ काळपर्यंत लढाऊ विमान चालविताना महिलांना अधिक त्रास होऊ शकतो, असेही लक्षात आले. तरीही महिलांना प्रत्यक्ष लढाऊ सेनेत सहभागी करून घ्यावे, ही मागणी सुरूच होती. शेवटी लष्करी वाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टर्स युनिटमध्ये महिलांना स्थान देण्याचा निर्णय झाला. महिलांनीही आपले कसब दाखविण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. १९९९ साली कारगिल युद्धादरम्यान गुंजन सक्‍सेना या महिला फ्लाइंग ऑफिसरच्या 'चिता' हेलिकॉप्टरने शत्रूच्या हद्दीत प्रवेश करून आपल्या जखमी जवानांना परत आणण्याचं धैर्य दाखवलं होतं.


झाले मोकळे आकाश

लगेच युद्धआघाडीवर पाठविले जाईल का? 
महिलांनी वाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टर्स उडविण्याचे काम अतिशय चोखपणे बजावले असताना, त्यांना लढाऊ विमाने चालविण्यास मज्जाव का केला जात आहे? त्यांना ही संधी केव्हा प्राप्त होणार? वायुदलप्रमुख अरूप राहा यांना गतवर्षी मार्च महिन्यात हाच प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी सांगितले की, 'महिलांच्या निसर्गत: काही समस्या असतात आणि त्या पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात. प्रामुख्याने जर महिला गर्भवती असतील, प्रारंभीचा काळ असेल तर, तसेच आरोग्याशी निगडित आणखी काही समस्या ही काही कारणे आहेत. तसेच लढाऊ विमाने प्रदीर्घ काळापर्यंत चालविताना महिलांना अधिक त्रास जाणविण्याच्या शक्यतांमुळेच त्यांना लढाऊ विमाने चालविण्याची संधी देण्यात आलेली नाही'. पण, आता दीड वर्षानंतर अरूप राहा यांनीच, महिलांनाही आता ही संधी उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा केली. याचा अर्थ त्यांना लगेच थेट युद्धआघाडीवर पाठविले जाईल असे नाही, पण त्यांच्यासाठी आजवर बंद असलेले युद्धाचे आकाश ‘मोकळे’ होईल . 

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही महिलांना युद्धात भूमिका वठविण्याची संधी मिळायला हवी, असे मत व्यक्त केले आहे. आज नवी अत्याधुनिक विमाने आणि हेलिकॉप्टर्स खरेदी केली जात आहेत. फ्रांसकडून भारत राफेल विमाने, तर अमेरिकेकडून अत्याधुनिक अपाचे आणि चिनुक हे हेलिकॉप्टर्स खरेदीचा करार नुकताच झाला आहे. शिवाय रशिया आणि इस्रायलकडून अत्याधुनिक विमाने खरेदी केली जात आहेत. भारताने स्वत: 'तेजस' ही स्वदेशनिर्मित विमाने आणि 'ध्रुव' हेलिकॉप्टर्स भारतातच निर्माण केले आहेत. 

त्यासाठी वैमानिकांची गरज भासणार आहे. सोबतच या विमानांसाठी लागणारा मेंटेनन्स विभाग आणि निगडित अन्य बाबींसाठी मनुष्यबळ लागणार आहे. त्याची जोरदार तयारी सर्व स्तरावर सरकारकडून सुरू आहे. प्रदर्शनी, जाहिराती, मेळावे, संवाद, चर्चासत्रे आदी माध्यमातून युवावर्गाला लष्करात भरती होण्याचे आवाहन केले जात आहे. या सर्व युवाशक्तीत महिलांचा सहभागही मोठा असणार आहेच. 

काही अनुत्तरित प्रश्‍न 
'प्रत्यक्ष युद्धात महिलांचा सहभाग' हे अजूनही पूर्ण न झालेलं स्वप्न आहे. पुरुषांपेक्षा महिला कमजोर असतात असा समज आहे पण त्या, बौद्धिक व मानसिकदृष्ट्याही युद्धासाठी सक्षम आहेत. किंबहुना शिस्तपालन व सहकाऱ्यांशी सौहार्दाने वागणं, परिपक्वता या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा सरस असल्याचं दिसलं आहे. भारतीय सैन्यात ९० टक्के जवान हे पुरुषप्रधान ग्रामीण भागातून येतात. ग्रामीण भागात आजही पुरुषप्रधान संस्कृती आहे. महिला लष्करात, युद्धभूमीवर दाखल होण्यासाठी फक्त महिलांनाच प्रशिक्षणाची गरज आहे असे नव्हे... तर त्यांना दलात सामील करून घेण्यासाठी पुरुषांचीही बरीच तयारी करून घ्यावी लागणार आहे. सध्या केंद्रीय निमलष्करी दलांमध्ये सीमा सुरक्षा दलासह एकूण ११ हजार ४१२ महिला आहेत. हा आकडा एकूण सैन्याच्या १.५ टक्का आहे. लष्करात ४१०१ महिला आहेत, मात्र त्या सहायक विभागांमध्ये म्हणजे सिग्नल यंत्रणा, तंत्रज्ञ, दारूगोळा इ. पुरत्याच सीमित आहेत. भारतीय नौदलात २५२ महिला आहेत, मात्र तिथेही त्यांची जहाजांवर आणि पाणबुडीवर नियुक्ती होत नाही. वायुदलात ८७२ महिला काम करतात. इथे युद्धक्षेत्र सोडलं तर त्यांना इतर सर्व विभागांत समाविष्ट करून घेण्यात आलं आहे. 

संरक्षणाची जबाबदारी सर्वोत्तम खांद्यावरच 
पुरुषांची मक्तेदारी असलेलं हे क्षेत्र त्यांनी जिंकलंय का? त्यांना पुरुषांच्या बरोबरीचा सन्मान मिळतोय का? १००० महिला पंजाब आणि पश्‍चिम बंगाल इथल्या सीमेवर तैनात आहेत. महिला म्हणून काही सवलतीही मिळतात. उदाहरणार्थ, पुरुषांना ३.२ किमीचं अंतर धावण्यास १३ मिनिटांचा कालावधी दिला जातो, तर महिलांसाठी तो निकष १७ मिनिटं आहे. कामावर दाखल झाल्यावरही त्यांना काही सवलती असतात. प्रत्यक्षात सीमेवर त्या गस्त घालतात, पण फक्त दिवसा... त्यांच्या कामाची वेळही सहा तासांचीच असते. पुरुषांना मात्र या सवलती नाहीत. त्यांच्या अधिकाऱ्यांपुढे महिला भरतीने नवे प्रश्‍न निर्माण केले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेची काळजी असल्याने अनेकदा आपल्या हाताखाली महिला घेण्यास अधिकारी काचकूच करतात. विशेषतः जेव्हा महिलांवर एखादी अवघड जबाबदारी सोपवायची वेळ येते, तेव्हा हे अधिकारी अधिकच सावधगिरी बाळगतात. अनेकांच्या म्हणण्याचा कल हा देशाच्या संरक्षणाची जबाबदारी ही सर्वोत्तम खांद्यावरतीच असायला हवी... मग तो पुरुषाचा असो वा स्त्रीचा...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.