रामराजे शिंदे, झी मीडिया, रायबरेली : रायबरेली आणि अमेठी दोन्ही शहरांची नावे डोळ्यांसमोर आली का आठवतो गांधी घराण्याचा गड... इंदिरा गांधी.. राजीव गांधी... सोनिया गांधी... राहुल गांधी... या चार पिढ्या पाहिलेले हे शहर. केवळ चार पिढ्या नव्हे तर देशाच्या राजकारणात दबदबा असलेले नेते.
यापैकी इंदिरा आणि राजीव हे दोघे पंतप्रधानपदी पोहोचले. सोनिया गांधी पण पंतप्रधानपदापर्यंत पोहोचल्या परंतू त्यांनी ते पद स्वीकारलं नाही. राहुल गांधी मात्र पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत. त्यांची शर्यत अद्याप सुरू आहे. (पुढे कधी नरेंद्र मोदी थकल्यानंतर राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाची संधी मिळू शकते.)
इंदिरा गांधी यांच्याबाबतीत रायबरेलीचा संदर्भ आणखी महत्त्वाचा ठरतो. १९७७ मध्ये आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांचा रायबरेलीत मोठा पराभव झाला होता. त्यावेळी देशाच्या राजकारणात भूकंप झाला होता, त्याचा केंद्रबिंदू रायबरेली होता.
उत्तर प्रदेश निवडणूकीच्या निमित्ताने रायबरेली आणि अमेठीला जाण्याचा योग आला. लखनौचं मतदान झाल्याबरोबर रायबरेलीला निघालो. रायबरेली मतदारसंघात व्हीआयपी लोकांची वर्दळ असते, त्यामुळे इथे हॉटेलसुद्धा चांगले असतील, अशी माझी आशा होती.
रायबरेलीत कोणतं चांगलं हॉटेल आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर रायबरेली पासून १०-१२ किमी अंतरावर 'चांगलं' हॉटेल मिळालं. हॉटेलची रूम पाहिल्यानंतर रायबरेलीतील चांगल्या हॉटेलची व्याख्या समजली. रायबरेलीत हे सर्वात चांगलं हॉटेल ? मग, इतर हॉटेल्सची आणि रायबरेलीची अवस्था कशी असेल.
उमेदवार : आदिती सिंग (काँग्रेस) आणि अनिता श्रीवास्तव (भाजप). शाहबाज खान (बसप)
रायबरेलीत काँग्रेस आणि भाजप मध्येच मुख्य लढत
हॉटेलवर बॅग ठेवून थेट रायबरेली शहराकडे निघालो. रायबरेतील गेल्याबरोबर एक चौक दिसला. चौकात ट्रॅफीक जाम झालं होतं. वाहतूक व्यवस्थेचा बो-या वाजला होता. इतका वेळ सहनशीलतेने शिटी मारत गाड्यांना मार्ग दाखवणारा ट्रॅफीक पोलीस आता थकल्याचं चेह-यावरून जाणवत होतं.
रायबरेलीतील या तुंबलेल्या वाहनांनी मुंबईतील अंधेरी आणि दिल्लीतील आयटीओ चौकातील ट्रॅफीकची आठवण करून दिली. मेट्रो सिटीतला हा अवगुण या शहरात दिसला. पाऊण तास झाला तरी गाडी हालत नव्हती. चौकातच एक चहावाल्याच्या टपरीवर काही लोकांची वर्दळ दिसली.
कॅमेरामन सुरजला म्हटलं चलो चाय लेते लेते. चाय पे चर्चा करते है. तिथे जाऊन टपरीवर बसलेल्या लोकांशी गप्पा सुरू केल्या. त्यापैकी एक व्यापारी... दुसरा मजदूर... तिसरा वेल्डींगचं काम करणारा तरूण आणि चौथा वृद्ध ग्रहस्थ बसले होते. त्यांच्याशी गप्पा मारताना विचारलं... ''भाई क्या लगता है इसबार अखिलेश सिंगजी की बेटी आदिती सिंग चुनाव में जितेगी..'' त्यापैकी राजन मिश्रा यानं सांगितलं... ''यहां काँग्रेस लोगों की मजबूरी है साब... यहां काँग्रेस के बगैर लोग किसी और को वोट नही देंगे.
अखिलेश सिंग की बेटीही जीत के आएगी...'' मी विचारलं.. ऐसा क्यों... मिश्रा म्हणाले, ''अखिलेश सिंग के खिलाफ जाकर मरना है क्या ?'' त्याच्या या वाक्यातून अखिलेश सिंग यांचा दबदबा दिसून येत होता. लेकीन काँग्रेसकडून हमेशा धोकाही मिला है.. हे बोलायलाही तो विसरला नाही. रायबरेली सदर मतदारसंघ वाचविण्यासाठी काँग्रेसला अखिलेश सिंग सारख्या गुन्हेगाराची मदत घ्यावी लागली.
अखिलेश सिंग यांची प्रतिमा डॉन असली तरी ते गरीबांसाठी तारणहार.. गरीबांसाठी अखिलेशची प्रतिमा रॉबिनहूड सारखी आहे. जो मस्तावलेल्या श्रीमंतांना लुटतो आणि गरीबाच्या घरात चूल पेटवतो. अखिलेश सिंग रायबरेली सदर मतदारसंघातून १९९३ ते २०१२ या कालावधीत सलग पाच वेळा निवडून विधानसभेत गेले. म्हणजेच, २५ वर्ष निरंकुश सत्ता. यातील तीनवेळा काँग्रेसकडून लढले.
काँग्रेसबरोबर वाद झाल्यानंतर बाहुबली नेता अखिलेश सिंग यांनी २००७ मध्ये अपक्ष निवडणूक लढवून जिंकून आले. २०१२ मध्ये त्यांनी पीस पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढविली. २००६ मध्ये रायबरेली पोटनिवडणूकीत सोनिया गांधी यांनी विक्रमी ८०.४ टक्के मते मिळवली, परंतू रायबरेतील पाच विधानसभा जागांपैकी ४ जागा काँग्रेसनं जिंकल्या. यातली रायबरेली सदर ही पाचवी जागा अखिलेश सिंग यांनी आपल्या ताब्यात ठेवली.
गांधी घराण्यासमोर.. त्यांच्याच घरात.. दंड थोपटून लढणारा एकमेव बाहुबली अखिलेश सिंग. त्यांनी मतदारसंघावर वर्चस्व राखण्यात कायम यश मिळालं. आता १३ वर्षानंतर पुन्हा अखिलेश सिंग यांनी आपल्या मुळ घरात पाऊल टाकले आहे ते म्हणजे काँग्रेस.
या घरवापसीनंतर काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. अखिलेश यांनी जेलमधूनसुद्धा जिंकण्याची करामत केली होती, त्यामुळे त्यांच्या ताकदीची जाणीव काँग्रेस श्रेष्ठींना आहे. अखिलेश सिंग यांची रायबरेलीमध्ये लोकप्रियता प्रचंड आहे. याच लोकप्रियतेचा फायदा त्यांची मुलगी आदिती सिंग हिला मिळणार आहे. परंतू अखिलेश सिंग यांची गुंड असल्याची प्रतिमा मात्र त्यांना पुसता आली नाही.
अखिलेश सिंग यांच्यावर हत्या, अपहरणाचे अनेक आरोप आहेत. काही प्रकरणात तर जेलची हवासुद्धा खाल्ली आहे. अखिलेश सिंग यांच्याच एका कार्यकर्त्याने माहिती दिली की, अखिलेश यांची तब्येत आता साथ देत नाही. त्यांना ब्लड कॅन्सर झाला असल्यामुळे मुलीला लवकर राजकारणात आणलं आहे.
अखिलेश सिंग यांनी २००२ मध्ये ९५ हजार ८३७ मतांनी विजय मिळवला. २००७ मध्ये ४६ हजार ७११ तर २०१२ मध्ये २९ हजार ४९४ मतांनी जिंकले. अखिलेश सिंग यांचा आलेख उतरता असला तरी आदिती सिंग यांचं राजकीय भवितव्य उज्ज्वल दिसतंय. आदितीच्या मदतीला प्रियंका गांधी धावून आल्या आहेत. प्रियंका गांधींच्या प्रचाराचा झंझावात... राहुल गांधीचं पाठबळ.. आणि अखिलेश सिंग यांची ताकद रायबरेलीचं चित्र घडवेल.
रायबरेली सदर मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण, याच मतदारसंघातून इंदिरा गांधी यांना सर्वाधिक मते मिळाली. रायबरेलीत आता चौका चौकात विकास के वास्ते, आदिती सिंग के रास्ते.. असे पोस्टर लावले आहेत.
आदिती यांनी अमेरिकेतील ड्युकन विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं. मागील तीन वर्षापासून ती रायबरेली सदर मतदारसंघात सक्रीय आहे. बाहुबलीची मुलगी म्हणून वावरताना तिच्यात कोणातीही अहंकार दिसत नाही. तिचे पिता अखिलेश सिंग गरम स्वभावाचे तर मुलीचा स्वभाव शांत आणि मनमिळावू. यामुळेच कमी वेळात आदितीला लोकांनी स्वीकारल्याचं दिसून येतंय.
भारतीय जनता पार्टीने अनिता श्रीवास्तव यांना रायबरेली सदरमधून निवडणूकीच्या मैदानात उतरवलं आहे. पेशाने वकील असलेल्या अनिता यांना रायबरेलीत जनाधार नाही. परंतू शेतक-याची मुलगी म्हणून अनिता यांना प्रोजेक्ट करण्यात आलं आहे. लोकसभेच्या वेळी भाजपनं 'अच्छे दिन' स्लोगनचा वापर केला होता तर यावेळीही रायबरेलीत भाजप कडून 'अच्छे दिन लाएंगे' घोषवाक्याचा प्रचार जोरात केला जात आहे.
अनिता श्रीवास्तव म्हणजे भाजपनं दिलेला बळीचा बकरा, अशी चर्चा रायबरेलीत सध्या जोरात सुरू आहे. फारसं वक्तृत्व आणि राजकारणाचा गंध नसलेल्या अनिता श्रीवास्तव यांची पूर्ण मदार मोदींच्या कामकाजावर आहे. त्यामुळे रायबरेलीतील समस्याबाबत बोलतानाही केंद्रीय पातळीवरील निर्णयाचा आधार घ्यावा लागतो.
रायबरेली सदर मतदारसंघाच्या समस्या जैसे थे आहेत. काही ठिकाणी रस्ते गुळगुळीत असले तरी रायबरेली शहरात खड्ड्यांचं साम्राज्य आहे. अस्वच्छतेमुळे रायबरेलीची अवस्था आयसीयू मधील पेशंटसारखी दिसते.
रायबरेली मध्ये रेल्वे कोच कारखाना आहे. रेल्वेचे डब्बे बनवण्याचं काम इथं होतं. लालू प्रसाद यादव यांनी रायबरेली आणि बिहारमधील एका ठिकाणी रेल्वे कोच कारखाना स्थापन करण्याची घोषणा केली होती. दरम्यान लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये रेल्वे कोच कारखाना तयार करून सुरूही केला. इकडे काँग्रेससारख्या बलाढ्य पक्षाच्या मुख्य नेत्या असूनही सोनिया गांधी यांना कारखाना लवकर सुरू करता आला नाही.
एक तर उशीर झाला घोषणा करून लगेच सुरू केला. परंतू सोनिया गांधी असूनसुद्धा इथे उशीर लागला. हा कारखाना बनवण्यासाठी येथील स्थानिकांची जागा सरकारने घेतली. परंतू त्यांनाही नोकरी मिळाली नाही. स्थानिकांना डावललं आणि परप्रांतियांना या कारखान्यात नोकरी दिल्याचा आरोप होतोय.
विशेषत: बिहारमधून आलेल्यांना नोकरी दिल्याबद्दल स्थानिकांत संताप आहे. रायबरेलीतील आयटीआय बंद होण्याच्या मार्गावर आहे. आता फक्त २०० कामगाराच उरले असून त्यांनाही काढण्याचं काम सुरू आहे.
सोनिया गांधी यांनी रायबरेली शहराजवळच्या मुन्शी गंजमध्ये एम्स साठी जागा घेतली. या जागेवर ६ वर्षांपूर्वी नारळ फोडून एम्स बांधण्याच्या कामाला हिरवा कंदील दिला. परंतू अद्याप एम्स सुरू होण्याचा पत्ता नाही. ओपीडीचं कामही झालं नाही. इथल्या लोकांना लखनऊ आणि दिल्लीला उपचारासाठी जावं लागतं. एम्सच्या आश्वासनांचा नारळच लोकांच्या हाती टेकवला.
पावसाळ्यात बाजारात सर्वत्र वाहतूक कोंडी समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच, पावसाळ्यात पाणी साचलं जातं. रस्त्यावर पाणीच पाणी असते. पाणी घुसतं... ड्रेनेज सिस्टिम नसल्यामुळं पाणी साचून वाहतूक कोंडी होणं नेहमीचंच. रोगराईनं रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय.
रायबरेलीत गांधी आश्रमात खादी ग्रामोद्योगचं काम चालतं. आसपासच्या गावातून लोक याठिकाणी येतात. चरख्यांची संख्या जादा असल्यामुळे काम चालतं. परंतू नोटबंदीमुळे खादीला ग्रहण लागलंय. ४० टक्के विक्री घटल्याचं खादी ग्रामोद्योगाचे प्रमुख राम सिंग सांगतात.
निवडणूक आल्यामुळे मात्र कामगारांना नवीन रोजगार मिळाला. रोज प्रचारासाठी जावं लागतं, त्यासाठी भरपूर पैसे मिळत असल्याचंही राम सिंग सांगतात. नोटबंदी आणि आता निवडणूकीमुळे कामगारांनी खादीकडे पाठ फिरवली. मागणी असेल तर पुरवठा करता येतो. परंतू कपडेच कोणी खरेदी करायला तयार नाही. मागील काही महिन्यापासून खादी ग्रामोद्योगचं काम बंद झालं. गांधी घराण्याच्या घरात महात्मा गांधीचा चरखा मशिन धूळ खात पडला.
रायबरेलीतील प्रसिद्ध 'इंदिरा गांधी स्मारक वनस्पती उद्यान' येथे पोहोचलो... या उद्यानाचा शुभारंभ तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी २२ नोव्हेंबर १९८८ रोजी केला. या उद्यानात इंदिरा गांधी यांची पूर्णाकृती पुतळा स्थापन करण्यात आला आहे.
खरंतर इंदिरा गांधी यांची आठवण रहावी यासाठी, औषधी वनस्पतींचे उद्यान करण्याचा उद्देश यामागे होता... आत्ता या उद्यानाची अवस्था न पाहिलेली बरी.. औषधी वनस्पती हे नाव फक्त बाहेर फलकावर दिसतं... प्रत्यक्षात एकही औषधी वनस्पती रोपटं दिसलं नाही. काही ठिकाणी हिरवळ आणि कोरडी पडलेल्या कारंजी नजरेस पडतात.
या उद्यानाची आता 'वेगळी' ओळख निर्माण झाली आहे. या उद्यानाला आता 'किसिंग पार्क' या नवीन नावाने ओळखलं जातं. अन्य काही कार्यक्रमासाठी उद्यानाची जागा भाड्याने दिली जाते.
रायबरेलीवासियांचं गांधी घराण्यावर प्रेम असलं तरी गांधी घराण्यानं रायबरेलीला कधी आपलं घर समजलं का, हा प्रश्न मनात पडतो. गांधी घराण्याचं मन दिल्लीत रमतं... मते मिळवण्यासाठी मात्र रायबरेली आठवते.
एक पाय दिल्लीत आणि दुसरा पाय रायबरेलीत ठेवून राजकारण करण्यात आत्तापर्यंत काँग्रेस यशस्वी ठरली. या यशाचं गमक काय आहे हे विचार करत होतो... त्याचवेळी राजन मिश्राचं शब्द आठवले... "काँग्रेस हमारी मजबूरी है साब.." मग, दुसरा प्रश्न मनांत घोळत होता, रायबरेलीवासीय या मजबूरीतून कधी बाहेर पडणार ?
माझ्याकडे उत्तर नव्हते.. रायबरेलीवासीयांना उत्तर सापडेल का माहित नाही...रायबरेलीचा प्रवास आटोपून अमेठीच्या दिशेने निघालो... त्यावेळी माझ्या ड्रायव्हरने गाणं लावलं... 'जिंदगी की सफर में गुजर जाते वो मकाम... वो फिर नहीं आते.. वो फिर नही आते...'
बाय बाय रायबरेली...