www.24taas.com, मुंबई
अनंत चतुर्दशीपासून ते नवरात्रीच्या पहिल्या दिवसामधल्या पंधरवड्याला पितृपक्ष म्हणतात. या काळात कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही. कुठल्याही नव्या कामाची सुरूवात केली जात नाही, किंवा कुठलीही नवी वस्तू खरेदी केली जात नाही.
पितृपक्षाची सुरूवात अनंत चतुर्दशीनंतरच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला होऊन ती अमावस्येला संपते. या अमावस्येलाच सर्वपितरी अमावस्या म्हटलं जातं. या काळात निधन पावलेले पितर म्हणजे वडीलधारी मंडळी तसंच इतर मृत नातलग यमलोकातून आपल्या नातेवाइकांकडे येतात. या काळात ते आपल्या अवती भवती वास्तव्य करून राहातात. त्यामुळेच या काळात पुन्हा श्राद्धविधी केले जातात. या श्राद्धकर्मांमधून पितरांबद्दल आदर राखला जातो. यामुळे पितरांना सद्गती प्राप्त होते. मोक्ष मिळतो. तसंच ज्यांच्या मृत्यूदिनाविषयी निश्चित माहिती नसते,त्यांचंही श्राद्ध या दिवसांमध्ये केलं जातं.
या वेळी कलं जाणारं पिंडदान हे देखील याच कारणास्तव केलं जात असतं. काही वेळा आपल्या मृत पितरांना स्वर्ग मिळाला नसतो. त्यांना दुसरा जन्मही मिळाला नसतो. असे आत्मे पितृलोकात किंवा आपल्याच आवती भवती भटकत राहातात. त्यांच्या क्षुधाशांतीसाठी पिंडदान करण्याची पद्धत आहे. मात्र लहान वयात मृत्यू झालेली बालकं किंवा संन्यास धारण केलेले पितर यांना पिंडदान केलं जात नाही. सर्व पितृमोक्ष अमावस्येला आपल्या घराण्यातील सर्व मृत पूर्वजांचं श्राद्ध केलं जातं.