कायदा हातात कोणी घेऊ शकत नाही - मुख्यमंत्री

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत कोणताही वाद नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय. मात्र, कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांना लगावला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 26, 2012, 01:46 PM IST

www.24taas.com,मुंबई
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत कोणताही वाद नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय. मात्र, कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांना लगावला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक शिवाजी पार्कातच व्हावं. अशा प्रसंगी कायदा विरोधात असेल तर कायदा हातात घेण्याचं आवाहन शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलं होतं. इतर प्रश्न ज्याप्रमाणे शिवसेना हाताळते, तशाच प्रकारे शिवसेना स्टाईलनं हा प्रश्न हाताळला जाईल, असा इशारा जोशी यांनी दिला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिहल्ला केला आहे.

शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मारकास मराठी माणूसच विरोध करत असल्याचं दु:ख होत असल्याचं आणि त्याची चीडही येत असल्याचं सांगत त्यांनी मनसेलाही टोला हाणला होता. मात्र, मनसेला नाहक बदनाम करण्यात येत आहे. यात शिवसेना राजकारण करीत असल्याचे मनसेने जोशी यांच्या टीकेनंतर म्हटले होते.
कायदा हातात घेण्याची भाषा करुन त्यांनी सरकारला आणि विशेष करुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आव्हान दिले होते. त्यावर नाव घेता मनोहर जोशी यांना चव्हाण यांनी उत्तर दिलेय.