मनसेचा राष्ट्रवादी विरोध खरा की दिखावा?

राज ठाकरेंचा राज्यातला दौरा चांगलाच गाजला तो अजित पवार आणि राष्ट्रवादीवरच्या टीकेवरून.. दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे चांगलेच राजकारण रंगलं. आणि त्यातून हा वाद थेट दगडफेकीपर्यंत पोहोचला. मात्र मनसेचा राष्टवादी विरोध खरा आहे की दिखावा?

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 6, 2013, 07:00 PM IST

विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद
राज ठाकरेंचा राज्यातला दौरा चांगलाच गाजला तो अजित पवार आणि राष्ट्रवादीवरच्या टीकेवरून.. दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे चांगलेच राजकारण रंगलं. आणि त्यातून हा वाद थेट दगडफेकीपर्यंत पोहोचला. मात्र मनसेचा राष्टवादी विरोध खरा आहे की दिखावा?

राज ठाकरेंनी आपल्या चारही सभांमध्ये राष्ट्रवादी आणि अजितदादांवर जोरदार टीका केली होती. त्यावर त्याच आवेशात अजितदादांनी उत्तरही दिलं. मात्र राज्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर असतानाही वरचढ कोण? याकडेच या राजकारण्यांचं लक्ष होतं. असं टीकासत्र सुरू असताना मनसेचा राष्ट्रवादी विरोध किती खरा असा प्रश्न निर्माण होतोय. कारण राष्ट्रवादीवर टीका करणारा मनसे राष्ट्रवादीसोबत ठाण्यात महापालिकेत आणि औरंगाबादमध्ये जिल्हा परिषदेत सत्तेत भागीदार आहे. याबाबत स्थानिक नेत्यांना विचारलं असता त्यांनी जनतेसाठीच सत्तेत भागीदार असल्याचं सांगून वेळ मारुन नेली आहे. तर मनसेच्या भूमिकेवर भाजपनं मात्र सडकून टीका केलीय.

काही दिवसांआधी मुंबईत राज ठाकरेंनी अजितदादांची गुपचूपपणे भेट घेतल्याचीही माहिती मिळत आहे. त्यात कदाचित या भांडणाच्याच राजकारणाचीच खिचडी तर शिजली नाही ना असा प्रश्न निर्माण होतो.