लग्नाचा जाब विचारला; दिलं पेटवून!

दुसऱ्या महिलेबरोबर लग्न केलं म्हणून जाब विचारणाऱ्या प्रेयसीला ऑफिसमध्येच अंगावर रॉकेल ओतून प्रियकरानं पेटवून दिलंय. औरंगाबादमधली ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 6, 2013, 03:01 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद
दुसऱ्या महिलेबरोबर लग्न केलं म्हणून जाब विचारणाऱ्या प्रेयसीला ऑफिसमध्येच अंगावर रॉकेल ओतून प्रियकरानं पेटवून दिलंय. औरंगाबादमधली ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडलीय.
पदमपुरा भागात राहणाऱ्या शकुंतला टाक या ३२ वर्षीय महिलेचे आणि सूर्यकांत चाटे या ३१ वर्षीय पुरुषाचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. शकुंतला ही विवाहित असून तिचं तिच्या पतीशी पटत नसल्यानं ती आईकडेच राहत होती. तिला दोन मुली आणि एक मुलगाही आहे. उदरनिर्वाहासाठी गेल्या चार वर्षांपासून ती नीता मेट्रो टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयामध्ये बुकिंग क्लार्क म्हणून काम करते. सूर्यकांत याच ट्रॅव्हल्सचा मालक. अदालत रोडवरील ‘नीता मेट्रो टूर्स अँड ट्रॅव्हल्स’मध्ये या दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले आणि संपलेही.
सूर्यकांतनं दोन महिन्यांपूर्वी लग्न केलं... पण शकुंतलाशी नाही तर दुसऱ्याच महिलेशी... ही गोष्ट जेव्हा शकुंतलाला समजली तेव्हापासून ती प्रचंड तणावाखाली होती. लग्नाच्या कारणावरून दोघांमध्ये नेहमी भांडण होत होते. याच कारणावरून आज सकाळी ११.३० च्या सुमारास दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या वेळी शकुंतलाने स्वत:ला पेटवून घेण्याची धमकी दिली. तेव्हा सूर्यकांतनेही ‘तुला काय करायचे ते कर’ असे म्हणाला. याच्यानंतर शकुंतलाने घरातून रॉकेलची बाटली भरून नीता मेट्रो टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात आणली. वाद पुन्हा सुरू झाल्यानंतर सूर्यकांतने शकुंतलाच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. शकुंतलाची आरडाओरड ऐकून रस्त्यावरील नागरिकांनी कार्यालयाच्या दिशेने धाव घेतली. नागरिक येत असल्याचे पाहून सूर्यकांतने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत ती ९० टक्के भाजली होती.

शकुंतलाच्या नातेवाइकांनी सूर्यकांतला हॉस्पीटलमध्येच अपघात विभागात मारहाण केली. पोलिसांनी सूर्यकांतची सुटका करत बंदोबस्तात त्याला क्रांती चौक पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.