विशाल करोळे,www.24taas.com, औरंगाबाद
मराठवाडा दुष्काळानं होरपळतोय. मात्र तरीदेखील सरकारकडून मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचं दिसून येतंय. मराठवाड्यात जनावरांसाठी 11 तर अहमदनगरमध्ये 173 चारा छावण्या आहेत. त्यामुळे सरकारकडून असा दुजाभाव का होतोय? असा प्रश्न शेतक-यांकडून विचारला जातोय.
महाराष्ट्रात यंदा भीषण दुष्काळ जाणवतोय. त्यामुळे राज्यातल्या 969 गावांमध्ये यावेळी भीषण पाणीटंचाई आहे. दुष्काळामुळे जनावरांना चाराही नाही. त्यांच्यासाठी सरकारनं टंचाईग्रस्त भागात छावण्या सुरू केल्यात. चारा छावण्यांवर सरकारनं आत्तापर्यंत 214 कोटी 13 लाख रुपये खर्च केलेत. आणि चारा वितरणासाठी 684 कोटी 29 लाखांचा निधी वितरित केलाय. मात्र हा खर्च करताना मराठवाड्याकडे दुर्लक्ष केल्याचं समोर येतंय. महाराष्ट्रात नगरमध्ये 173, सोलापूरमध्ये 109, साता-यात 89, सांगलीत 20, बीडमध्ये 8, उस्मानाबाद जिल्ह्यात 2 आणि पुण्यामध्ये 1 अशा जवळपास 401 जनावरांच्या छावण्या सुरू आहेत.
जनावरांच्या चारा छावण्यांची ही संख्या पाहता सर्वात कमी छावण्या मराठवाड्यात असल्याचं दिसंतय. यावर मराठवाड्यातल्या सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडली आहे. या जीवघेण्या दुष्काळामुळे बळीराजावर आपल्या लाडक्या जनावरांना विकण्याची वेळ आली आहे. मराठवाड्याला प्रत्येक वेळी आपल्या हक्कासाठी भांडावं लागतं. आधी पाण्यासाठी आणि आता चा-यासाठी ओरड करावी लागणार आहे. कारण ओरड केल्याशिवाय हक्काचं काहीच मिळत नाही असाच काहीसा अनुभव मराठवाड्यातल्या लोकांना आहे.