www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून 100 हून अधिक जणांना फसवणा-या एका भामट्याला औरंगाबाद पोलिसांनी अटक केलीय. ग्रामीण भागातल्या तरुणांकडून या भामट्यानं लाखो रुपये उकळले आणि सिनेमात नियुक्त झाल्याचं नियुक्तीपत्रही दिलं. मात्र सिनेमाच्या शूटिंगला सुरुवातच होत नसल्यानं तरुणांनी चौकशी केल्यानंतर सगळं गौडबंगाल उघडकीस आलं.
स्वत:ला ‘नटरंग प्रॉडक्शन’चा निर्माता असल्याचं सांगणा-या दीपक म्हस्केनं अनेक तरुणांना सिनेमात हिरो बनण्याचं स्वप्न दाखवलं होतं. त्यासाठी तो औरंगाबाद विद्यापीठातल्या नाट्यशास्त्र विभागात जाऊन तरुणांशी संवादही साधत असे. तरुणांना नट्यांसोबतचे फोटो दाखवून त्यांचा विश्वास संपादन करायचा... आणि तुम्हालाही असं हिरो बनायचं असल्यास पैसे खर्च करणं कसं गरजेचं आहे हे पटवून द्यायचा...गरज पडल्यास दीपक तरुणांच्या आई-वडिलांनाही विश्वासात घेत असे. अनेक तरुणांनी त्याच्या बोलण्याला भूलून 70 हजार ते 1 लाख रुपये देऊ केले होते. पैसे दिल्यानंतर तरुणांचा विश्वास बसावा म्हणून दीपक त्यांना शॉर्टलिस्ट झाल्याचं नियुक्तीपत्र आणि नटरंग प्रॉडक्शनचं ओळखपत्र द्यायचा. हँडी कॅमेरावर तरुणांच्या स्क्रीन टेस्ट घेत असे. मात्र पैसे देऊनही सिनेमा काही सुरू होत नव्हता. यासंदर्भात चौकशी केल्यानंतर त्या भामट्यानं फसवणूक केल्याचं उघड झालं.
मुलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या भामट्याला अटक केलीय. तसंच यासंदर्भात रॅकेट कार्यरत असल्याचा संशयही पोलिसांना आहे. आतापर्यंत 7 तरुणांनी पोलिसांत तक्रार दाखल केलीय. मात्र अजूनही अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यताय. अशा प्रकारचा भामटा तुमच्यासमोरही कधीतरी येऊ शकतो त्यामुळं तरुणांनो सावधान...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.