२५ लाखांत मेडिकलला प्रवेश; भामटे अटकेत

औरंगाबादला वैद्याकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने लोकांना गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 15, 2012, 05:26 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबादला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने लोकांना गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. मूळचे पुण्याचे आणि मुंबईचे असलेले हे भामटे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न मिळालेल्या मुलांना हेरायचे आणि त्यांच्याकडून २५-२५ लाख रुपये उकळून प्रवेश मिळवून देण्याची भाषा करायचे. मात्र औरंगाबाद पोलिसांनी वेळीच त्यांच्या मुसक्या आवळल्यात.
हनुमंत हिंगे आणि हा चैतन्यकुमार सिंग... या दोन भामट्यांनी औरंगाबादच्या एमजीएम मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देतो म्हणून औरंगाबादकरांना लाखो रुपयांना गंडा घातलाय. हे भामटे ज्या विद्यार्थ्यांचा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही अशा मुलांचा शोध घ्यायचे आणि त्यांना फोन करून मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याची बतावणी करायचे. यापोटी विद्यार्थ्यांकडून २५ लाख रुपये डोनेशनही घ्यायचे आणि विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याचे खोटे पत्र द्यायचे. मात्र, एका पालकाला याप्रकरणी फसवणून होत असल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली.
दोघांकडून पोलिसांनी २० लाख रुपयांची रक्कम, लॅपटॉप, क्रेडिट, डेबीट कार्ड्स असा मुद्देमाल जप्त केलाय. या भामट्यांनी फसवलेले तीन विद्यार्थी आतापर्यंत समोर आलेत. या टोळीची अनेक राज्यात पाळंमुळं असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अनेक मोठी नावंही पुढे येण्याची शक्यता आहे.