जळालेल्या फळबागांना सरकारचा ठेंगा

पूर्णपणे जळालेल्या फळबागांना मदत करण्याऐवजी राज्य सरकारनं ठेंगाच दाखवल्याचं सत्य समोर आलंय. खुद्द राज्याचे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदमांच्या बोलण्यातूनच हे सत्य उघड झालंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 22, 2013, 11:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
पूर्णपणे जळालेल्या फळबागांना मदत करण्याऐवजी राज्य सरकारनं ठेंगाच दाखवल्याचं सत्य समोर आलंय. खुद्द राज्याचे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदमांच्या बोलण्यातूनच हे सत्य उघड झालंय. जळालेल्या बागांना मदतीचं धोरणच ठरवलं नसल्याची धक्कादायक कबुली मंत्री महोदयांनी दिलीय. पतंगराव कदमांनी असं वक्तव्य करून दुष्काळात होरपळत असलेल्या शेतक-यांची त्यांनी क्रूर थट्टाच केलीय.
मराठवाड्यातल्या मोसंबीच्या बागांची ही अशी अवस्था झालीय. जीवापाड जपलेल्या मोसंबीच्या बागेवर अनेक ठिकाणी शेतकरी स्वत:च कु-हाड उगारतोय. तर काही ठिकाणी मोसंबीच्या बागाच पेटवून देतोय. सरकारकडून काही तरी मदत मिळेल या आशेवर शेतकरी होता. मात्र सरकारनं केवळ जगू शकणा-या मोसंबीच्या बागांसाठी तीस हजारांची मदत घोषित केलीय. आणि ती ही दोन हप्त्यात... मात्र अनेक ठिकाणी ही मदत अजूनही पोहचलेलीच नाही. एवढं कमी म्हणून की काय, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री पंतगराव कदम यांनी एक नवा बॉम्बगोळा टाकलाय. पूर्णपणे जळालेल्या बागांच्या मदतीचं धोरणच केंद्र आणि राज्य सरकारनं ठरवलंच नसल्याचं धक्कादायक सत्य त्यांनी उघड केलंय. त्यामुळे बळीराजाच्या पायाखालची जमीनच सरकलीय. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 7 हजार 704.66 हेक्टरवरील फळबागा पूर्णपणे जळाल्यायत. त्यात तब्बल 7 हजार हेक्टरवर केवळ मोसंबीच्या बागा आहेत. तर इतर जळालेल्या बागांमध्ये आंबा, आणि डाळिंबांचा समावेश आहे. यामुळं जवळपास 2500 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करताय..
मराठवाड्यात फळबागांची अशी विदारक स्थिती असतानाही मंत्री महोदयाचं विधान आश्चर्यकारकच आहे. एवढंच नाही तर आता शेतक-यांनी करावं तरी काय? असा प्रश्न पतंगरावांना विचारला असता त्यांचं उत्तर काहीसं असं होतं. सरकारकडून मदत मिळेल या आशेवर असणा-या शेतक-यांनी आत्तापर्यंत पाण्याअभावी जळालेल्या बागा तोडल्या नव्हत्या. मात्र सरकारच्या या उत्तरानंतर करायचं तरी काय? असा प्रश्न बळीराजाला सतावतोय.
मराठवाड्यात सर्वच पक्षाच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी दौरै केले आणि मदतीचं भरघोस आश्वासनंही दिलं. मात्र पावसाळ्याच्या तोंडावर आता सरकारची भाषाच बदलल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळं दुष्काळात भाजून निघणा-या शेतक-यांची ही क्रूर थट्टाच नाही का असा प्रश्न या निमित्तानं बळीराजाला पडलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.