www.24taas.com, मुंबई
तब्बल सहा दशके ५० हजारांहून अधिक गाणी आपल्या जादुई स्वरात गाऊन जागतिक विक्रम करणार्या् गानसम्राज्ञी लतादीदी यांच्यावर पन्नास वर्षांपूर्वी ‘विषप्रयोग’ झाला होता. त्याचा खळबळजनक गौप्यस्फोट प्रख्यात डोगरा कवयित्री पद्मा सचदेव यांच्या ‘ऐसा कहां से लाऊ’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात गानसरस्वती लता मंगेशकर यांच्याबद्दल एक खळबळजनक घटना लिहिली आहे आणि ही घटना खुद्द लतादीदींनीच आपल्याला सांगितल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
१९५०-६० दशकात जेव्हा लतादीदींची कारकीर्द ऐन बहरात होती, त्यावेळी त्यांच्यावर जळणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्यावर विषप्रयोग केला होता. १९६२ साली लतादिदींवर व्यावसायिक स्पर्धेतून विषप्रयोग करण्यात आला होता.
यापूर्वीही एका मुलाखतीत लतादीदींनी या दुर्धर प्रसंगाची हकीकत सांगितली होती. एके दिवशी सकाळी उठल्यानंतर लतादीदींना पोट बिघडल्याचे जाणवले अणि त्यांना उलट्य़ांवर उलट्या होऊ लागला. या उलट्य़ांचा रंग हिरवट होता. यानंतर लतादिदींच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या. त्यांना बेशुद्धीचं इंजेक्शन देण्याची वेळ डॉक्टरांवर आली होती. पुढील तीन दिवस लतादीदी तडफडत होत्या.त्या मरणाच्या दाराशी पोहोचल्या होत्या. मात्र, दैव बलवत्तर म्हणून त्या वाचल्या. पुढील तीन महिने त्यांच्या पोटात सतत आग पडायची. त्यामुळे अन्न न घेता त्या फक्त थंड सूप पिऊन राहात असत.
या प्रसंगानंतर लतादीदींकडे काम करणारा आचारी फरार झाला होता. त्यामुळे त्याच्यावरच सर्वांना संशय आहे. यानंतर लतादीदींच्या स्वयंपाकाची जबाबदारी त्यांची धाकटी बहीण उषा मंगेशकरांनी स्वतःवर घेतली.