पद्म पुरस्कारांसाठी नावांची फक्त `सूचना`, शिफारस नाही!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर सध्या एका बातमीमुळे चांगल्याच भडकल्यात. कारण, यंदाच्या पद्म पुरस्कारांसाठी आपल्या कुटुंबीयांचं किंवा मित्रांच्या नावाची सिफारस करणाऱ्यांमध्ये आता लतादीदींचंही नाव जोडलं गेलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 12, 2013, 08:18 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गानसम्राज्ञी लता मंगेशकर सध्या एका बातमीमुळे चांगल्याच भडकल्यात. कारण, यंदाच्या पद्म पुरस्कारांसाठी आपल्या कुटुंबीयांचं किंवा मित्रांच्या नावाची सिफारस करणाऱ्यांमध्ये आता लतादीदींचंही नाव जोडलं गेलंय. लता मंगशकर यांनी हे कबूल केलंय की त्यांनी दोन नावं समितीसमोर ठेवलीत पण, आपण त्या नावांची शिफारस नाही तर फक्त समितीला सूचना केलीय.
माहितीच्या अधिकाराखाली केल्या गेलेल्या एका अर्जाच्या उत्तरानुसार, यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या शिफारस यादीत काही लोकांनी इतर अनेक उमेदवारांच्या नावाची सूचना केलीय. तर काहींनी या सन्मानासाठी आपले कुटुंबीय आणि मित्रांची नावं पुढे केली आहेत.
या अर्जाच्या उत्तरात म्हटल्यानुसार, ८४ वर्षीय गायिका लता मंगेशकर यांनी या प्रतिष्ठित सन्मानासाठी दोन नावांची शिफारस केलीय. यामध्ये पहिलं नाव आहे त्यांच्या बहिणीचं... उषा मंगेशकर यांचं आणि दुसरं नाव आहे पार्श्वगायक सुरेश वाडकर यांचं...
याबाबतील मीडियात आलेल्या बातम्यांवर लतादीदी भडकल्यात. ‘रविवारी मी वर्तमानपत्रात वाचलं की पद्म पुरस्कारांसाठी मी काही लोकांच्या नावाची शिफारस केलीय. पण मी सांगू इच्छिते की दरवर्षी माझ्याकडे पुरस्कारांसाठी नावांची सूचना करण्यासाठी समितीचं पत्र येतं’ असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.
त्या म्हणतात, ‘यावर्षी मी माझी बहिण उषा आणि मित्र सुरेशजी यांची नावं सूचवली आहेत कारण ते या पुरस्कारासाठी योग्य व्यक्ती आहेत. उषानं आसामी, मराठी, गुजरातीसोबतच जवळजवळ सगळ्याच भारतीय भाषांमध्ये गाणं गायलंय आणि सुरेशजी गेल्या ४० वर्षांपासून संगीताला योगदान देत आहेत’.

‘भारत-रत्न’ या उच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या गायिका लता मंगेशकर यांनी यामुळेच पुढच्या वर्षीपासून पद्म पुरस्कारांसाठी कोणत्याही नावांची शिफारस न करण्याचा निर्णय घेतलाय. ‘मी या प्रतिभावानं व्यक्तींची नाव सूचवून काहीही चूकीचं केलेलं नाही, परंतु यानंतर मी कोणत्याही नावांची शिफारस करणार नाही’ असं त्यांनी म्हटलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.