www.24taas.com, मुंबई
मी राजीनामा दिला आहे. त्यामुळे तो मागे घेण्याचा प्रश्नच नाही. आता माघार नाही. सरकारमध्ये पुन्हा पद घेण्याचा विचार नाही. पक्ष मजबूत करण्याला प्राधान्य देऊ, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे.
अजित पवारांनी राजीनाम्याची पार्श्वबभूमी काल उलगडून सांगितली. आघाडी सरकारमध्ये काम करताना ‘घालमेल` झाल्याचा सूर दिसून आला. या नाराजीनाम्याला पवार विरुद्ध पवार, अशा संघर्षाची किनार देण्याच्या प्रयत्नांची त्यांनी खिल्ली उडवली. आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना मुख्यमंत्र्यांकडे आलेल्या तक्रारी आणि इतर काही विषयांबद्दल आपणास माहिती न दिल्याची काही उदाहरणे त्यांनी दिली.
काही मंत्र्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. त्याबाबत काही तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे आल्यानंतर त्यांनी त्याबाबची सूचना संबंधितांना द्यायला हवी. पण तसे झाले नाही. चुका झाल्या असतील तर त्या नाकारत नाही. पण आघाडीचा धर्म म्हणून नेतृत्वाने त्याबाबतची चर्चा सहकारी पक्षासोबत करायलाच हवी, असे अजित पवार म्हणालेत.
सिंचन प्रकल्पावर श्वे तपत्रिका काढण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. मात्र, ती निघतच नाही. मंत्रिपद सोडल्यानंतर पक्ष मजबूत करण्याला प्राधान्य असेल असे, यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अजित पवारांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केलीत. मात्र, अजित पवारांना ती पटलेली नाहीत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधातील आंदोलनाचा निषेध अजित पवार यांनीच केला. कोणत्याही कार्यकर्त्यांनी असे प्रकार करू नयेत, असे अजित पवारांनी बजावले आहे. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत.