www.24taas.com, श्रीनगर
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अफजल गुरुच्या फाशीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. या फाशीमुळे खोऱ्यातील तरुणांच्या एका पिढीत अन्यायाची भावना निर्माण होईल, असं त्यांनी म्हटलंय.
‘अफजल गुरुला फाशी देण्याच्या अगोदर त्याला त्याच्या कुटुंबीयांना शेवटचं भेटण्याचीदेखील संधी दिली गेली नाही’ यावर अब्दुल्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. संसद हल्ला प्रकरणातील दोषी अफजल गुरु (४३ वर्ष) याला शनिवारी गोपनीय रित्या फासावर चढवलं गेलं तसंच त्याच्या शवाचा तुरुंग परिसरातच दफन करण्यात आलंय.
अफजल गुरुच्या फाशीवरून ओमर अब्दुल्ला यांची नाराजी यावेळी स्पष्ट दिसून येत होती. ‘अजूनही बरेच प्रश्न होते ज्याची उत्तरं मिळणं गरजेचं होतं’ असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय. ‘गुरुच्या फाशीचे चिंताजनक दीर्घकालिन परिणाम लक्षात घेणं आवश्यक आहे.. कारण काश्मीरमधल्या तरुणांची नव्या पीढीला एखाद्या वेळेस मकबूल भट्ट प्रकरण माहित नसेल पण अफजल गुरु त्यांना नक्कीच माहित आहे’ असंही त्यांनी म्हटलंय. मकबूल भट्ट याला भारतीय राजनायक रवींद्र म्हात्रे याच्या ब्रिटनमध्ये झालेल्या हत्या प्रकरणात १९८४ मध्ये फाशी दिली गेली होती.
मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलंय की, ‘कृपया आपल्याला हे समजून घेणं आवश्य आहे की काश्मीरमधील एकापेक्षा जास्त पिढी अशी आहे की जी स्वत:ला पीडितांच्या स्वरुपात आजही पाहते आणि आपल्याला कधीच न्याय मिळू शकणार नाही, अशीच त्यांची धारणा आहे’