‘योग’ दुर्धर व्याधींवर गुणकारी

मूळ पौर्वात्य देशांमध्ये फायदे सर्वश्रुत असूनही दुर्लक्ष झालेला ‘योग’ हा दुर्धर व्याधींवर गुणकारी असल्याचे अमेरिकी तज्ज्ञांच्या गटाने अभ्यासातून स्पष्ट केले.

Updated: Nov 2, 2011, 08:11 AM IST

झी २४ तास वेब टीम,  वॉशिंग्टन 

 

मूळ पौर्वात्य देशांमध्ये फायदे सर्वश्रुत असूनही दुर्लक्ष झालेला  ‘योग’ हा दुर्धर व्याधींवर गुणकारी असल्याचे अमेरिकी तज्ज्ञांच्या गटाने अभ्यासातून स्पष्ट केले.

 

शरीरातील विविध विकारांवर तातडीने डॉक्टरकडे धाव घेणाऱ्या नागरिकांपेक्षा योगसाधना करणाऱ्या व्यक्ती अधिक आरोग्यसंपन्न जीवनशैली अनुभवत असल्याचे या तज्ज्ञांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. अमेरिकी वैद्यकपत्र ‘अ‍ॅनल्स ऑफ इंटर्नल मेडिसीन’ आणि ब्रिटनमधील यॉर्क विद्यापीठाच्या संशोधकांच्या नेतृत्त्वाखाली ३०० नागरिकांची या अभ्यासात तपासणी  करण्यात आली.

 

योगसाधनेच्या अभ्यासाबाबत  ब्रिटनमधील हा सर्वात मोठा अभ्यास मानला जातो.  या अभ्यासकांनी पाहणीसाठी निवडलेल्या नागरिकांची विभागणी केली. जुनी दुखणी असलेल्या १५६ नागरिकांना त्यांनी योगसाधना करण्यासाठी निवडले. उरलेल्या १५७ नागरिकांना इलाजासाठी डॉक्टरांकडे सोपवले. तीन महिन्यांनंतर योगसाधना करणाऱ्या व्यक्तींमध्ये डॉक्टरांकडे उपचार घेणाऱ्यांपेक्षा ३० टक्के चांगला बदल दिसून आला. शरीराच्या वेगवान हालचाली आणि कार्यतत्परतेचा गुण त्यांच्यात आढळला.

सातत्याने औषध घेणाऱ्या नागरिकांपेक्षा योगसाधना करणाऱ्यांच्या वेदना औषधे न घेता तीन महिन्यांच्या कालावधीत निम्म्याहून अधिक घटल्या. गेल्या महिन्यात अमेरिकी वैद्यकपत्राने ( मेडिकल मॅगेझिन) केलेल्या अभ्यासात योग आणि शरीराच्या ताणन क्रियेद्वारे पाठीचे दुखणे कमी होत असल्याचे म्हटले आहे.

 

गेल्यावर्षी योगासंबंधी पाहणीत ताणतणाव, स्तनांचा कर्करोग, ह्रृदयरोग  यांच्यावर योगसाधना गुणकारी असल्याचे म्हटले होते. ब्रिटनमधील ८० टक्क्य़ांहून अधिक नागरिकांना पाठींच्या दुखण्याने अथवा विविध दुखण्यांनी ग्रासले असल्यामुळे नव्या पाहणीतील निष्कर्ष उपयुक्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.