हैदराबाद हादरलं

हैदराबादचा दिलसुखनगर भाग पुन्हा एकदा स्फोटांनी हादरला. सायकलवर ठेवलेल्या 2 बॉम्बच्या स्फोटांमुळे 11 जण ठार तर 78 जण जखमी झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा देशातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 21, 2013, 11:39 PM IST

www.24taas.com, मुंबई
हैदराबादचा दिलसुखनगर भाग पुन्हा एकदा स्फोटांनी हादरला. सायकलवर ठेवलेल्या 2 बॉम्बच्या स्फोटांमुळे 11 जण ठार तर 78 जण जखमी झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा देशातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

संध्याकाळी 7 वाजून 1 मिनिटं
आनंदकिशन सेंटरजवळ पहिला स्फोट
संध्याकाळी 7 वाजून 6 मिनिटं
कोणार्क आणि वेंकटाद्री थिएटर बाहेर दुसरा स्फोट दिलसुखनगर या हैदराबादच्या अत्यंत गजबजलेल्या भागात ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या स्फोटांमुळे एकच गडबड उडाली. याधीही या भागात 2002 मध्ये स्फोट घडवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा निष्पापांच्या किंचाळ्यांनी हा भाग हादरला...स्फोटानंतर लगेचच NIA, NSG, IB, ATS अशी तपास पथकं तात्काळ हैदराबादच्या दिशेने रवाना झाली. 100 ते 150 मीटर अंतरावर असलेल्या सायकलवर ठेवलेल्या टिफिन बॉक्समधून हे स्फोट घडवण्यात आल्याचं समजतंय. या हल्ल्याची पूर्वसूचना दोन दिवसांपूर्वी मिळाल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी सांगितलं. त्यानुसार राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला होता असंही ते म्हणाले...
हैदराबादच्या या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीसह कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुंबईतही मोठया प्रमाणात सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. या हल्ल्यात मृत पावलेल्यांना 2 लाखांची तर जखमी झालेल्यांसाठी 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे. या स्फोटामागे इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात असावा असा संशय व्यक्त करण्यात येतोय...पण यामुळे पुन्हा एकदा देशातील जनता दहशतवादी हल्ल्यांपासून सुरक्षित नाही हेच दिसून आलंय..
हैदराबाद दोन स्फोटांनी हादरलंय. दिलसुखनगर नावाच्या अत्यंत गजबजलेल्या भागात हा स्फोट झाल्याने एकच धावपळ उडाली. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत या स्फोटात 11 जण ठार तर 78 लोक जखमी झाले आहेत. हे स्फोट सायकल ठेवण्यात आले होते अशी माहिती त्यांनी दिली आहे. 100 ते 150 मीटरच्या अंतरावर असलेल्या 2 सायकलवर हे बॉम्ब ठेवल्याची माहिती त्यांनी दिली. हे स्फोट इंडियन मुजाहिदीन हा दहशतवादी संघटनेने घडवल्याचा संशय व्यक्त केला जातोय, पण याला अधिकृत दुजोरा केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिला नाही. पहिला स्फोट संध्याकाळी 7 वाजून 1 मिनिटाने झाला. हा स्फोट आनंदकिशन सेंटरजवळ झाला. तर दुसरा स्फोट 7 वाजून 6 मिनिटाने वेंकटाद्री थिएटरच्या बाहेर झाला. हैद्राबाद एनआयएची टीम घटनास्थळी दाखल झाली असून महाराष्ट्र एटीसएची टीम हैदराबादच्या दिशेने रवाना झाली आहे. तर एनएसजीची टीमही तात्काळ हैदराबादकडे निघणार आहे.

याआधी 2002 सालीही दिलसुखनगर स्फोटांनी हादरलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा हा भाग स्फोटांनी हादरला आहे. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट घोषित केला आहे. त्याचप्रमाणे सगळ्य़ा महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून मुंबईतील बीएआरसी आणि चेंबुर परिसरातील रिफायनरीजची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.