www.24taas.com, मेघा कुचिक, मुंबई
सिक्सर किंग युवराज सिंग त्याच्या चाहत्यांना टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळतांना पाहता येण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी युवीची निवड होऊ शकते. सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी युवी लवकरातलवकर टी-२० टीममध्ये कमबॅक कराव असं मत व्यक्त केलं आहे.
टी-ट्वेन्टी वर्ल्ड कप मोहिमेसाठी युवराजची टीम इंडियाला किती आवश्यक आहे हेच निवड समितीचे अध्यक्ष के श्रीकांत यांनी स्पष्ट केलं. टी-२० चॅम्पियनशिप आणि त्यानंतर वन-डे वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विजयात सर्वात मोलाचा वाटा राहिलाय तो युवीचा. त्यामुळेच भारताच्या धडाकेबाज बॅट्समननं वर्ल्ड कपपूर्वी पूर्ण फिट व्हावा अशीच इच्छा श्रीकांत यांनी केली. गेल्या वर्षभरापासून युवी कॅन्सरशी झुंज देत होता. कॅन्सरविरूद्धचं युध्द युवीनं जिद्द आणि चिकाटीनं जिंकल. आता या आघातानंतर युवराजला वेध लागले आहेत ते टी-२० वर्ल्ड कपचे.
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताकडून खेळण्याची तीव्र इच्छा युवराजनं एका कार्यक्रमात व्यक्त केली होती. टी-२० वर्ल्डकपसाठी सज्ज होण्यासाठी युवीने बंगळुरूमध्ये प्रॅक्टीसला सुरूवातही केली. महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिस दरम्यान युवीने ईशांत शर्माला खणखणीत सिक्सर्स लगावत आपला फिटनेस आणि फॉर्मचा दाखला दिला. यामुळे तो लवकरच टीम इंडियात दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते.