www.24taas.com, मुंबई
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या टाचेची दुखापत बळावली आहे. टाचेच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी सचिन लंडनला रवाना झाला आहे. दुखापतीमुळे आयपीएल-5 ला तो मुकण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. बीसीसीआयनही सचिनच्या दुखापतीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सचिनला त्याच्या टाचेवरील दुखापतीसाठी कालच लंडनला जावं लागलं आहे. त्यामुळे काल द्रविडच्या सत्कारालादेखील त्याला उपस्थित राहता आलं नाही. त्याच्या टाचेवर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सचिन शस्त्रक्रिया करून भारतात परतल्यास त्याला आयपीएलला - 5 मध्ये मात्र खेळता येणार नाही.
गेले अनेक दिवस तो दुखापत घेऊनच खेळत होता. सचिनने नुकतेच महाशतक पूर्ण केलं. मात्र इंग्लड दौऱ्यापासून त्याला ही दुखापत झाली होती. म्हणूनच आता त्याला शस्त्रक्रियेसाठी लंडनला जावं लागलं आहे. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये खेळता येणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाकडून असे सांगण्यात येत आहे की, सचिन आयपीएल मध्ये नक्कीच खेळेल, दोन दिवसांत सचिन पुन्हा मुंबईत येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सचिन आयपीएल खेळणार की मुकणार याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसंच मुंबई इंडियन्स गेल्या वेळी फायनलमध्ये हरली होती. त्यामुळे यंदा त्यांचाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.