जडेजाऐवजी युसूफ पठाणला संधी?

टीम इंडियाच्या स्पिनर्सची कामगिरी गेल्या काही मॅचेसमधून समाधानकारक झालेली नाही. त्यातच धोनीच्या आवडत्या रवींद्र जाडेजाला तर काहीच कमाल करता आलेली नाही.

Updated: Mar 15, 2012, 12:54 PM IST

वृषाली देशपांडे, www.24taas.com, ढाका

 

टीम इंडियाच्या स्पिनर्सची कामगिरी गेल्या काही मॅचेसमधून समाधानकारक झालेली नाही. त्यातच धोनीच्या आवडत्या रविंद्र जाडेजाला तर काहीच कमाल करता आलेली नाही. त्यामुळे फ्लॉप जाडेजाऐवजी युसूफ पठाणला आगामी बांगालादेशविरुद्धच्या मॅचमध्ये संधी  मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

 

रविंद्र जाडेजाकडे एक ऑलराऊंडर म्हणून पाहीलं जातं. त्यानं काही मॅचेसमध्ये टीम इंडियासाठी ही भूमिका चोखपणे पार पाडली आहे. मात्र, गेल्या काही मॅचेसमध्ये त्याला लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. जाडेजा सतत अपयशी ठरत असतानाही त्याच टीममधील स्थान कायम आहे. चांगली कामगिरी करत नसतांनाही त्याच टीममधील स्थान अबाधित असल्यानं त्याच्या समावेशाबद्दल अनेक प्रश्न उभ राहिले आहेत. केवळ कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा आवडता क्रिकेटपटू असल्यानचं त्याला वारंवार संधी मिळतेय अशी चर्चाही भारतीय क्रिकेटविश्वात रंगू लागली आहे. जाडेजा गेल्या काही मॅचेसमध्ये सपशेल अपयशी ठरला आहे. बॉलर म्हणून तर तो अपयशी ठरलाच आहे. शिवाय एक बॅट्समन म्हणूनही त्यानं निराशा केली आहे.

 

रविंद्र जाडेजाला ९ वन-डे मॅचेसमध्ये केवळ ३ विकेट्स घेण्यात यश आलं आहे. ४१ रन्सवर १ विकेट ही त्याची बॉलिंगमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.  बॅटिंगमध्ये त्यानं १०१ रन्स केले आहेत. नॉटआऊट २४ रन्स ही त्याची सर्वोत्तम इनिंग ठरली आहे. टीममध्ये ऑलराऊंडर म्हणून खेळणाऱ्या जाडेजाला बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये टीम इंडियासाठी जबरदस्त कामगिरी करता आलेली नाही.

 

जाडेजानं निराशा केल्यानं  त्याच्याऐवजी युसूफ पठाणला टीममध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतरच युसूफची निवड एशिया कपसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे मैदानावर चमकदार कामगिरी करण्यास तो आतूर आहे. युसूफ एक स्फोटक बॅट्समन तर आहेच शिवाय त्याची पार्टटाईम स्पिन बॉलिंगही मॅचमध्ये निर्णायक ठरते.त्यामुळे त्याला संधी मिळाल्यास युसूफ भारतासाठी मॅचविनरची भूमिका बजावू शकतो. मात्र, धोनी आपल्या लाडक्या जाडेजाला डावलून युसूफ पठाणला संधी देतो का? ते पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.