वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे ते जुहूपर्यंतचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत; गोखले-बर्फीवाला पूल खुला, पण...

Gokhale Bridge: गेल्या 5 महिन्यांपासून जोडणीचे काम सुरू असलेला गोखले पूल व सी.डी बर्फीवाला पुल अखेर खुला करण्यात आला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 5, 2024, 09:42 AM IST
 वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे ते जुहूपर्यंतचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत; गोखले-बर्फीवाला पूल खुला, पण...  title=
Alignment with Gokhale bridge complete Barfiwala flyover open to traffic from 5 july

Mumbai Gokhale Bridge Update: सी.डी बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यामची एक मार्गिका खुली करण्यात आली आहे. आज 5 जुलै पासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. वाहतूक व्यवस्थापनासंबंधित सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळं आता नागरिकांना जुहूपासून अंधेरी असा पश्चिम - पूर्व प्रवास करण्याची सोय उपलब्‍ध झाली आहे. मात्र, यावेळी हलक्या वाहनांना पुलावर वाहतुकीसाठी प्रवेश, अवजड वाहनांना बंदी असणार आहे. 

अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या समांतर उंचीवर जोडल्यानंतर, वाहतूक व्यवस्थापनाची संबंधित कामे व चाचण्या पूर्ण होवून गुरूवार, दिनांक ४ जुलै २०२४ सायंकाळी ५ वाजेपासून जुहू दिशेने अंधेरी असा प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्‍यात आली आहे. सध्‍या हलक्या वाहनांनाच पुलावर प्रवेश दिला जाणार असून अवजड वाहनांना वाहतुकीस मनाई करण्‍यात आली आहे. 

अंधेरी परिसराला पूर्व आणि पश्चिम जोडणारा, वाहतुकीसाठी महत्वाचा दुवा असलेल्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या उंचीशी समांतर अशा पातळीवर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीच्या दृष्टीने नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार तांत्रिक सल्लागारांच्या देखरेखीखाली सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यात आली आहेत. या अंतर्गत सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग एका बाजुला १,३९७ मिलीमीटर आणि दुस-या बाजुला ६५० मिलीमीटरवर उचलण्यात आला आहे. या जोडणीसाठी गत दोन महिन्‍यांपासून अथक कामे सुरू होती. हे आव्‍हानात्‍मक काम दिवस रात्र सुरू ठेवून ७८ दिवसात पूर्ण झाले आहे. पुलावर वाहतूक सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती संरचनात्मक कामे, वाहतूक व्यवस्थापनाची अनुषांगिक कामे, इतर चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. 

सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी उचलण्याची कार्यपद्धती व सर्वसाधारण आराखडा हा वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) तसेच, भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) यांच्‍याद्वारे आरेखित करण्‍यात आला होता. तर, पूल जोडणी कार्यपद्धती वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) यांचेद्वारे निश्चित करण्‍यात आली होती. भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) यांनी या कार्यपद्धतीची पडताळणी करुन त्यात काही सुधारणा सुचवल्या होत्या. सुधारित कार्यपद्धतीची अंमलबजावणी ही महानगरपालिकेमार्फत वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था यांच्या निरीक्षणाखाली करण्यात आली.  

या पुलावर जुहू पासून अंधेरी असा पश्चिम - पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरळीत आणि संरचनात्मकदृष्ट्या सुरक्षित (स्‍ट्रक्‍चरली सेफ) असल्‍याचे 'व्हिजेटीआय' मार्फत घोषित करण्‍यात आले आहे. पुलाच्‍या मार्गिकेवरील वाहतूक सुरू करण्‍याच्‍या दृष्‍टीने वाहतूक व्‍यवस्‍थापना संबंधित अनुषांगिक कामे व चाचण्‍या वाहतूक पोलिसांच्या सुचनेनुसार पूर्ण करण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यानुसार (दिनांक ४ जुलै २०२४) सायंकाळी ५ वाजेपासून पश्चिम - पूर्व मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्‍यात आली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू

गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या दुसऱया टप्प्यातील काम सध्या रेल्वे भागातील हद्दीत सुरू आहे. त्यामुळे सी. डी. बर्फीवाला आणि गोखले पुलावर फक्त हलक्या वाहनांना प्रवेशासाठी मुभा देण्यात आली आहे. तर अवजड वाहनांसाठी उंची रोधक (हाईट बॅरिअर) बसविण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. जुहू पासून अंधेरी असा  पश्चिम - पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर हलक्या वाहनांच्या सोयीसाठी वाहतुकीचे नियोजन हे मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. परिणामी वाहतूक कोंडी कमी होतानाच इंधन व वेळेच्‍या बचतीसह वायू प्रदूषण कमी होण्‍यास मदत होणार आहे.