www.24taas.com, लंडन
लंडन ऑलिम्पिकच्या दरम्यान लंडन शहरात पाण्याच्या वापरावर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. ऑलिम्पिक पार्क आणि स्पर्धा आयोजीत करण्यात आलेल्या लंडन आणि आसपासच्या परिसरात पाच एप्रिलपासून होसपाईपच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. दक्षिणपूर्व इग्लंड आणि इस्ट अँगलिया ते उत्तरपूर्व लंडन या परिसरात दृष्काळ सदृष्य परिस्थिती असल्याने पाण्याच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे.
आतापर्यंतच्या उपलब्ध रेकॉर्डनुसार दक्षिणपूर्व इंग्लंडमध्ये फक्त 1892-93 आणि 1920-21 या वर्षांमध्ये कमी पाऊस झाला होता. ब्रिटीश सरकारने पर्यावरण आणि ग्रामीण कारभार खात्याच्या मार्फत दष्काळ जाहीर केला आहे. पर्यावरण खात्याच्या सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे बाधित झालेल्या भागांमध्ये पाण्याच्या वापरावरील तात्पुरत्या निर्बंधामुळे सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या परिस्थितीत सुधारणा होईल. लंडन शहराला पाणी पुरविणाऱ्या थेम्स वॉटरच्या प्रवक्त्यानुसार गेली दोन वर्षे लंडन शहराला कोरडीच गेली आहेत आणि गेल्या 24 महिन्यांपैकी जवळपास 19 महिने थेम्सच्या खोऱ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
थेम्स वॉटरच्या नव्या थेम्स गेटवे प्रकल्पातून 150 दशलक्ष लिटर्स अधिक पाणी पुरवठ्याची क्षमता आहे आणि ते दहा लाख लोकांना पुरेसं आहे. लंडन ऑलिम्पिकच्या दरम्यान दिवसाला 120 दशलक्ष लिटर्स अधिक पाण्याची गरज भासणार आहे. ऑलिम्पिक खेळांच्या आयोजन समितीच्या प्रवक्त्यानुसार सर्व परिस्थितीचा आढावा घेत ऑलिम्पिक दरम्यान पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ असं म्हटलं आहे.