समीकरण... लग्नाचं आणि आत्महत्येचं

जर तुम्हाला असं वाटत असेल की, पतीपासून विभक्त झालेल्या, विधवा किंवा एकट्या राहणाऱ्या महिला आत्महत्येच्या मार्गावर असतात, तर तुम्ही साफ चुकीचे आहात. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय गुन्हेगारी अहवालानुसार, अशा महिलांचं प्रमाण हे विवाहित महिलांच्या प्रमाणापेक्षा कित्येक पटीनं कमी आहे.

Updated: Jul 5, 2012, 01:00 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

जर तुम्हाला असं वाटत असेल की, पतीपासून विभक्त झालेल्या, विधवा किंवा एकट्या राहणाऱ्या महिला आत्महत्येच्या मार्गावर असतात, तर तुम्ही साफ चुकीचे आहात. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय गुन्हेगारी अहवालानुसार, अशा महिलांचं प्रमाण हे विवाहित महिलांच्या प्रमाणापेक्षा कित्येक पटीनं कमी आहे.

 

‘झी रिसर्च ग्रुप’नं या अहवालाचं अवलोकन केलं त्यावेळी ही धक्कादायक माहिती उघड झालीय. या अहवालात हे दिसून येतं की, देशात आत्महत्या करणाऱ्या महिलांचं प्रमाणामध्ये विवाहित महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. तर पतीपासून विभक्त झालेल्या महिला मात्र, फारच कमी वेळा आत्महत्येचा मार्ग स्विकारतात. महिलांच्या विविध प्रश्नांवर काम करणाऱ्या एका संस्थेच्या म्हणण्यानुसार, पतीपासून विभक्त झाल्यानंतर महिला दु:खी झालेल्या असतात, पण या दु:खापेक्षा या महिलांमध्ये जबाबदारीची भावना जास्त असते. त्यामुळे त्या क्वचितच आत्महत्येकडे वळताना दिसतात. 2010-2011 या अहवालात ही गोष्ट ठळक दिसून येते. महिला हक्कांवर काम करणाऱ्या रंजना कुमारी म्हणतात, 'काडीमोड झाल्यानंतर महिलांना सर्वात जास्त काळजी असते ती आपल्या मुलांची... निराश होऊन त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारला तर त्यांच्या मुलांचं काय होणार हा प्रश्न त्यांना सर्वात जास्त सतावतो. त्यामुळेच त्या आत्महत्या करण्यापूर्वी तीनदा तरी विचार करतात आणि सरते शेवटी जबाबदारीची जाणीव होऊन कणखर बनून आत्महत्येपासून परावृत्त होतात. '

 

विभक्त महिलांचं आत्महत्या करण्याचं प्रमाण कमी असेल तरीही अजून ते 31.4 टक्के एवढं आहे. म्हणजेच जवळजवळ विवाहित पुरुषांच्या आत्महत्येच्या प्रमाणाएवढं... आत्महत्या करणाऱ्यांमध्ये जवळजवळ 70 टक्के व्यक्ती विवाहित होत्या. विवाहित महिलांमधील आत्महत्येचं प्रमाण होतं 68.2 टक्के तर विवाहित पुरुषांच्या आत्महत्येचं प्रमाण आहे तब्बल 71 टक्के... बऱ्याचदा लग्नानंतर आपसुकच येणाऱ्या आर्थिक जबाबदाऱ्या पेलण्यात पुरुष कमी पडतात. त्यामुळे समाजाकडून अवहेलना स्विकारण्याऐवजी ते आत्महत्येचा मार्ग स्विकारतात.

 

एनसीआरबी अहवालानुसार, 2011 मध्ये एकूण एक लाख पस्तीस हजार लोकांनी आत्महत्या केलीय. म्हणजेच हे प्रमाण तासाला 16 जण असं आहे. आत्महत्यांचं प्रमाण पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत सर्वाधिक आहे. यामध्ये पश्चिम बंगालनं सर्वात वरचं स्थान पटकावलंय.