जुलै महिन्यात थायलंडमध्ये आलेल्या पूरात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. पण त्याचा सर्वाधिक फटका कम्प्युटर वर्ल्डला बसणार आहे. या प्रचंड पुरामुळे केवळ इंटेलच नव्हे तर सीगेटसारख्या अनेक हार्ड डिस्क तयार करणाऱ्या कंपन्यांचे मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, इंटेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनीच हार्ड ड्राइव्हच्या पुरवठ्यावर येत्या तिमाहीत घट होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
इंटेलच्या या इशाऱ्यामुळे एचपी, डेल, लेनोवो, एसर अशा कम्प्युटर्स आणि लॅपटॉप बनविणाऱ्या कं पन्यांनीही तत्काळ पावले उचलत हार्ड ड्राइव्हचा उपलब्ध स्टॉक जपून वापरत कम्प्युटर्सच्या निर्मितीच्या वेगावर नियंत्रण आणले आहे. तसेच हार्ड ड्राइव्ह रिप्लेसमेंटवरही बंधने आणण्यात येणार आहे. परिणामी नजीकच्या काळात हा वेग मंदावून कम्प्युटर आणि लॅपटॉपच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे.
सिगेट टेक्नोलॉजीला मात्र पुराचा सरळ फटका बसला नसला तरी कंपन्यांना होणाऱ्या विविध पार्ट्सचा पुरवठा बंद झाल्याने त्यांच्याही उत्पादनावर बंधने येत आहे. उत्पादनावर कुऱ्हाड कोसळली असल्यामुळे शेअर बाजारातही इंटेलला चांगलाच फटका बसत असून कंपनीचे शेअर्स ४.८ टक्क्यांनी घटले आहेत. इंटेलसह एनविडीया या कंपनीचे शेअर्सही ३ टक्क्यांनी घसरलेत. निदान पुढील काही काळ तरी हार्ड डिस्क आणि कम्प्युटर, लॅपटॉपच्या बाजारात अनिश्चितता असेल.