www.24taas.com, पुणे
पिंपरी-चिंचवड महापालिका महापौरपदाच्या शर्यतीत आमदार विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे यांचं नाव आघाडीवर आहे. पण त्याचबरोबर अनेक अनुभवी नगरसेवकांनीही या पदावर दावा केला आहे. मात्र, नेते अजित पवार मोहिनी लांडे यांना संधी देतील का, याचीच चर्चा आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये महापौरपदाची चर्चा सुरू होताच स्थानिक नेत्यांनी सावध पावलं टाकायला सुरुवात केलीय. पक्षाकडे महापौरपदासाठी अनेक इच्छुक उमेदवार असल्याचं स्पष्ट करतानाच नेत्यांनी कुणाचंही नाव घ्यायचं टाळलंय. पहिल्यांदा सभागृह नेत्याचा निर्णय होईल आणि महापौर मग ठरवला जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. असं असलं तरी आमदार विलास लांडे यांच्या पत्नीची निवड जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जातंय. महापालिकेत एकही पद न घेतलेल्या मोहिनी लांडे यांनी महापौरपदासाठीच कुठलंही पद न घेतल्याची चर्चा आहे.
पिंपरीचा बालेकिल्ला अजित पवारांनी राखलाय. आणि पिंपरी म्हणजे अजित पवार हे समीकरण आणखी पक्कं केलंय. त्यामुळे कोणी कितीही दावे करत असलं तरी महापौर मात्र अजित पवारच ठरवणार आहेत. त्यामुळे ही चर्चाच असल्याचे बोलले जात आहे.