'देव तारी त्याला कोण मारी' याचा अनुभव पुण्यातल्या एका शाळकरी विद्यार्थ्याला आलाय. य़ा शाळकरी मुलाचं परिचयातल्या एका तरुणानं खंडणीसाठी अपहरण केलं. त्याला रुमालानं फाशीही देण्यात आली. तरीही तो मुलगा आश्चर्यकारकरित्या बचावलाय. तर अपहरणकर्ते गजाआड झालेत.
मृत्यू काय आहे हे पुण्यातल्या लहानग्यानं याची देही याची डोळा अनुभवलंय. १३ वर्षाच्या या शाळकरी मुलाला फाशीच्या भयानक अनुभवातून जावं लागलं. रोजच्यासारखं शाळेत निघालेल्या या मुलाचं त्याच्याच परिचयातल्या तेजस जागडेनं साथीदाराच्या मदतीनं अपहरण केलं. मुलाला खेड- शिवापूर रस्त्यावर नेऊन रुमालानं फाशी देण्यात आली. बेशुद्ध झालेला मुलगा मेल्याचं समजून तेजस आणि त्याच्या साथीदारानं तिथून पळ काढला. मात्र मुलाच्या आयुष्याची दोरी बळकट होती. काहीवेळानंतर शुद्धीवर आलेल्या मुलाला तिथल्या स्थानिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं.
दुसरीकडं अपहरणकर्त्या तेजसनं मुलाच्या वडिलांकडून ६० हजारांची खंडणी मागितली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी दोघाही अपहरणकर्त्यांना शिताफीनं अटक केली.पुण्य़ासारख्या शहरात किती असुरक्षित वातावरण आहे याची प्रचिती या अपहरण प्रकरणानं स्पष्ट झालयं. पैशासाठी परिचयातली व्यक्ती जीवावर उठत असेल तर विश्वास कुणावर ठेवावा अशी अवस्था अपहरणनाट्यातून सुटलेल्या मुलाच्या पालकाची झालीये.