सततच्या 'कोल्हापूर बंद' मुळे नागरिक त्रस्त

गेल्या महिन्याभरात कोल्हापूरात ४ वेळा शहर बंद पाळण्यात आलाय. १२ डिसेंबरपासून व्यापाऱ्यांनी LBT विरोधात शहरातील व्यवसाय बंद ठेवलाय. कुणीही उठावं आणि शहर बंद करावं अशी अवस्था झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोल्हापूरातली जनता बंदला वैतागलीये.

Updated: Dec 17, 2011, 11:04 AM IST

झी २४ तास वेब टीम, कोल्हापूर

गेल्या महिन्याभरात कोल्हापूरात ४ वेळा शहर बंद पाळण्यात आलाय. १२ डिसेंबरपासून व्यापाऱ्यांनी LBT विरोधात शहरातील व्यवसाय बंद ठेवलाय. कुणीही उठावं आणि शहर बंद करावं अशी अवस्था झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोल्हापूरातली जनता बंदला वैतागलीये.

कोल्हापुरात शहर गेल्या महिन्याभरात दोन वेळा बेळगावमधील घडामोडींच्या निषेधार्थ  बंद ठेवण्यात आलं, एकदा शेतकऱ्यांच्या ऊस दराच्या आंदोलनाच्या निमित्ताने, तर एकदा शरद पवारांवर हल्ल्याच्या निषेधार्थ शहर बंद ठेवण्यात आलं. आता हे कमी की काय म्हणून 12 डिसेंबरपासून व्यापाऱ्यांचा LBT विरोधातला बंद सुरू आहे.

या बंदचा अतिरेक झाल्याची भावना कोल्हापूरकरांच्या मनात वाढीस लागलीये. ‘बंद’मुळे शाळा बंद ठेवल्या जातात, दुकानं बंद केली जातात आणि प्रवासासाठी माफक वाहनंही उपलब्ध नसतात.त्यामुळे कोल्हापुरातले नागरिक या 'बंद' प्रकाराला पुरते वैतागलेत.

हा मुद्दा राजकीय पक्षांपर्यत पोचवल्यावर त्यांनी मात्र आम्ही लोकांची अडचण होणार नाही याची काळजी घेतो असं अपेक्षित पाठ केलेलं उत्तर दिलं.

एखाद्या घटनेचे निषेध करण्याचे अनेक प्रकार असतात. ‘बंद’मागेही एक भावना असते. मात्र सातत्यानं बंद पाळून निषेधाची भावना बोथट झाल्याची स्थिती निदान कोल्हापुरात निर्माण झालीये.