झी २४ तास वेब टीम, नाशिक
नाशिक महापालिकेच्या इमारतीनंच पाटबंधारे विभागाची जागा बळकावली. माहितीच्या अधिकारात हे उघड होताच पाटबंधारे विभागानं महापालिकेला नोटीस बजावली. पण महिना उलटून गेला तरी महापालिकेनं काहीही कारवाई केलेली नाही.
गणेशवाडी परिसरात असलेली ज्ञानेश्वरी अभ्यासिका. आता ही जमीनदोस्त होते की काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याला कारण ठरलंय ते महापालिकेचं बेजबाबजदार धोरण. ज्या ठिकाणी इमारत उभी आहे, ती जागा पाटबंधारे विभागाची आहे. खुद्द महापालिकेनंच या जागेवर अतिक्रमण केल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालं. त्यामुळे राजकीय दबावामुळे ही अनधिकृत इमारत बांधण्यात आल्याचा आरोप होतो आहे.
पाटबंधारे विभागानं महापालिकेला तात्काळ नोटीस बजावून अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिलेत. मात्र नोटीस बजावून एक महिना झाला तरी महापालिकेनं कुठलीही कारवाई केलेली नाही. महापालिका प्रशासनानं लाखो रुपये खर्च करुन ही इमारत उभी केली. ज्यावेळी ही इमारत पाटबंधारे विभागाची असल्याचं लक्षात आलं, त्यावेळी पाटबंधारे विभागानं तात्काळ नोटीस बजावली. पण गेली दहा वर्षं महापालिकेचे अधिकारी काय करत होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.