झी २४ तास वेब टीम, नाशिक
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेप भोगलेल्या एका कैद्यानं आता न्यायालयात वकीली करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे खुनाच्या आरोपात शिक्षा भोगलेल्या हितेश शहा यानं आपली पदवी आणि वकिलीचं शिक्षण दोन्हीही कारागृहाच्या गजाआड राहून पूर्ण केलं.
हितेश शहा या तरुणानं आपल्य़ा व्यावसायिक स्पर्धेतून मुंबईत एकाची हत्या केली होती. १९९२ मध्ये त्याला या हत्येच्या आरोपातून जन्मठेपेची शिक्षा झाली. संतापाच्या भरात झालेली ही चूक हितेशला चांगलीच महागात पडली. अनेक वेळेस त्याच्या मनात आत्महत्येचा विचार आला. मात्र सर्व निराशा दूर सारत त्यानं मुक्त विद्यापीठाच्या बीएला प्रवेश घेतला आणि त्यानंतर त्यानं आपलं पदवी आणि वकीलीचं शिक्षण कारागृहात राहून पुर्ण केलं.
हितेशची जन्मठेपेची शिक्षा मार्च महिन्यात पूर्ण झाली आणि आता त्याची सुटकाही झाली. न्यायव्यवस्थेनं त्याची हुशारी पाहून मे महिन्यात त्याला सनद दिली. त्यामुळे आज हितेश आत्मविश्वासानं न्यायालयात फौजदारी वकिली करत आहे. कारागृहातल्या पंचावन्न टक्के कैद्यांना सर्वसामान्यांसारख जगायचं आहे मात्र त्यांच पुनर्वसन नीट होत नसल्याची खंत हितेशला वाटत आहे.जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कारागृहात राहूनही आपलं जीवन फुलवण्याची किमया हितेशनं केली. इतर कैद्यांनी आदर्श घ्यावा अशीच हितेशची कामगिरी आहे.